ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा हा चळवळीत नेहमीच आघाडीवर राहिला आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये सातारा जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड सुरू आहे. प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे समाज जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या विविध क्षेत्रांमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर प्रकाशझोत टाकणारे सातारा टूडे ऑनलाइन न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिवर्तनाची दृष्टी विकसित व्हावी, यासाठी 'सातारा टुडे'ची भूमिका आग्रही राहणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांचं अंतर्बाह्य प्रतिबिंब 'सातारा टुडे'मध्ये वाचकांना नक्कीच पाहायला मिळेल. मूल्याधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी नवी सांस्कृतिक ऊर्मी, नवा उत्साह आणि नव्या दिशा उत्सर्जित करण्याबरोबरच विचारांचा तळ ढवळून काढणारं मंथन आता 'सातारा टुडे'च्या माध्यमातून सुरू होत आहे. कव्हर स्टोरी, संपादकीय, सातारा लीक्स अशा वैविध्यपूर्ण सदरांतून आणि बातम्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा आवाज शासन, प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी 'सातारा टुडे'नं आपल्या खांद्यावर घेतली आहे. चांगल्या विचारांची पेरणी करून ते रुजविण्याचा वसा 'सातारा टुडे'नं घेतला आहे. जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांत घडणाऱ्या घटनांचा उहापोह यामध्ये असेल. समाजमनाचे प्रतिबिंब बनून 'सातारा टुडे' हा ई-न्यूजपेपर आणि साप्ताहिक स्वरूपात आम्ही वाचकांच्या हाती देत आहोत. प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ, विचारवंत, लेखक यांचे वैचारिक, प्रबोधनपर लेख, स्तंभलेखन, स्फुटलेखन याबरोबरच रंगीत छायाचित्रासह बातम्या, माहिती, ज्ञान, मनोरंजनाचा खजाना असलेलं एक परिपूर्ण आणि वाचनीय असं 'सातारा टुडे' न्यूज पोर्टल जिल्ह्यातील एकमेव आणि हक्काचं व्यासपीठ आहे.
सातारा जिल्ह्याच्या मातीत जितकी राकटता आहे तितका कणखरपणा आहे, तितकीच संवेदनशीलता आहे. विचार व मूल्ये यांची महती सांगणारी कलाकृती जिथे जन्माला आली ती ही माती. राष्ट्रसंत ते महंतांची तेजस्विता आणि पंडित शाहिरांची तपस्विता घेऊन सरता जिल्ह्याची भूमी सुगंधित झाली आहे. भूगोलाच्या नकाशावर भलेही आपला जिल्हा दगडधोंड्यांचा, काट्याकुट्याचा, नद्यानाल्यांचा असाच आहे; पण इतिहास, साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, शेती, उद्योग, पर्यटन, विविध परिवर्तनवादी चळवळी यामुळे सातारा जिल्हा समृद्ध आणि वैभवशाली बनला आहे. 'सातारा टुडे' या सर्व क्षेत्रांचा सर्वांगाने मागोवा घेत जिल्ह्याचा गौरवशाली इतिहास आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज झाला आहे. सातारा जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, तिच्या जोडीला असणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्वातंत्र्ययुद्धाशी जोडलेली सर्वसामान्यांची नाळ, धार्मिक अधिष्टानातून निर्माण झालेली सृजनशीलता, उपेक्षितांच्या, दीन-दुबल्यांच्या दुःखाशी झुंज देण्याच्या उर्मीतून आणि हळूवार सहजसुंदर संवेदनशीलतेतून निर्माण झालेले साहित्य ही सातारची समृद्ध खाण आहे. मानवी जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करणाऱ्या अनेक चळवळींनी या मातीत जन्म घेतला. सहकार, लेक लाडकी, पर्यावरण संवर्धन, दारूबंदी, ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, स्त्रीभ्रूणहत्याविरोधी मोहीम अशा सामाजिक परिवर्तनवादी आणि माणसाचे जीवनमान उंचावणाऱ्या चळवळीचे स्वरूप आणि त्यासमोरील आव्हाने, शेतीतील पारंपरिक पिकांपासून ते ऊस, स्ट्रोबेरीपर्यंतचा प्रवास, जिल्ह्याच्या अर्थकारणाला दिशा देणारा वाळू व्यवसाय, पवनचक्की, औद्योगिकरण या सर्वांचे अभ्यासपूर्ण चिंतन 'सातारा टुडे'च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचणार आहे.
विचारवंत, तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक यांचे अभ्यासपूर्ण विचारमंथन वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'सातारा टुडे' कटिबद्ध असेल. 'सातारा टुडे' वाचनीय तर असेलच; परंतु आकर्षक मांडणी, दर्जेदार लिखाण, बातम्यांमुळे सातारा जिल्ह्यातील नोकरी, व्यवसायानिमित्त जगभरात विखुरलेल्या भूमीपुत्रांना आपल्या जन्मभूमिशी 'सातारा टुडे' च्या माध्यमातून पुन्हा एकदा नाळ जोडली जाणार आहे.
Satara Today Office"
Flat No. 13, Malmatta No.409/5R,
Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001
02162-237474
+91 8806638484
sataratoday24x7@gmail.com
www.sataratoday.com