RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

शेतकऱ्यांचे आंदोलन हा तर पब्लिसिटी स्टंट : राधामोहन सिंह

पाटणा: देशभरातले शेतकरी सरकारच्या कृषी विरोधी धोरणाविरोधात संप करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. अशात शेतकऱ्यांचे आंदोलन हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करून केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. राज्यातला आणि देशातला शेतकरी अडचणींचा सामना करतो आहे. त्याच्या उत्पादनांना योग्य हमीभाव नाही. आर्थिक अडचणीत तर कायमच सापडलेला आहे. अशा सगळ्या संकटांच्या चक्रव्युहात अडकलेल्या बळीराजाची केंद्रीय कृषीमंत्र्यांनी क्रूर थट्टा केली आहे.

पाटणा या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात राधामोहन सिंह यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांना शेतकऱ्यांच्या संपाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा संप म्हणजे फक्त पब्लिसिटी स्टंट आहे असे म्हटले. देशभरात सुमारे १२ ते १४ कोटी शेतकरी आहेत. माध्यमांमध्ये प्रसिद्धी हवी असेल, चर्चा घडवून आणायची असेल तर संपासारखे प्रकार करावे लागतात असे बेताल वक्तव्य सिंह यांनी केले आहे.

एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना त्यांचा संप मागे घेण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांचे प्रश्न खरोखर गंभीर आहेत त्या प्रश्नांवर केंद्र सरकारचे बारकाईने लक्ष आहे. केंद्राच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर दुसरीकडे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी मात्र हा संप प्रसिद्धी मिळवण्यासाठी केला असल्याचे बेताल वक्तव्य केले आहे. संपावर गेलेले शेतकरी आधीच संतापले आहेत. अशात केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केलेले हे वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या संतापात भर पाडणारेच ठरले आहे.