RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

एक 'सेल्फी' भविष्यासाठी !

13 August 2019 at 16:42

'सेल्फी' देणारेच सेल्फी काढतात तेव्हा, सेल्फीच्या सेल्फीनेशची चर्चा

सातारा : सातारा जिल्हा हा तसा वायबी तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना मानणारा जिल्हा. चव्हाण साहेबांच्या पश्‍चात त्यांचे मानसपुत्र समजल्या जाणार्‍या शरद पवारांची जिल्ह्याच्या राजकारणावर मांड राहिलेली आहे. परंतू पवारांनी गेल्या 20 वर्षांमध्ये अभेद्य ठेवलेल्या या किल्ल्याला खुद्द सातार्‍यातूनच सुरुंग लागलेला आहे. माजी खा. लक्ष्मणराव पाटलांनंतर सरंजामीची वस्त्रे मिळालेल्या सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही भाजपचे कमळ असलेली वस्त्रे चढवण्याचा निर्धार केल्यामुळे ‘एक सेल्फी भविष्यासाठी’, असे म्हणत मिस्टर रामराजेंनाही दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांसोबत सेल्फी घेण्यात रस वाढलेला आहे. ही सेल्फी आहे, की सेल्फीनेस? असा प्रश्‍न राष्ट्रवादीतील कट्टर तसेच जुने जाणते पवार समर्थक कार्यकर्ते करीत आहेत.

राष्ट्रीयतेच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी 1999 साली राष्ट्रीय कॉंग्रेसशी फारकत घेतली. आपली वेगळी चूल  मांडून शरद पवारांनी आपल्या दुसर्‍या राजकीय अध्यायाला सुरुवात केली. हा अध्याय सुरु करत असतानाच महाराष्ट्रातील राजकारणातील सरंजाम्यांचीही गोळाबेरीज करण्यास सुरुवात केली. सातारचे छत्रपती, अकलूजचे मोहिते-पाटील, कागलचे मुश्रीफ, कोल्हापुरातील खानविलकर, उस्मानाबादचे पाटील आणि फलटणमधील तेव्हाच्या राजकारणातील कच्चे लिंबू असणारे नाईक-निंबाळकर यांना घेवून शरद पवारांनी राष्ट्रवादीची मोट बांधली. यातील निम्मेअर्धे साखर कारखानदार. कोणावर राज्य बँकेचे कोट्यवधींचे कर्ज, तर कोणाच्या मिळकती बँकांकडे तारण आहेत. याच्या जिवावर पवारांनी राष्ट्रवादी नावाची मेगा सर्कस उभी केली. 15 वर्षाच्या सत्ताकारणात राष्ट्रवादीने उभा महाराष्ट्र व्यापून काढला. चांद्यापासून बांद्यापर्यंत राष्ट्रवादीची हवा झाली. परंतू 2014 च्या मोदी लाटेत राष्ट्रवादीची हवा विरुन गेली. परिणामी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत झाले. परंतू ज्या पानिपतच्या तिसर्‍या लढाईला सातार्‍यातील छत्रपतींनी आदेश दिला, तो सातारा मात्र अभेद्य राखण्यात राष्ट्रवादी यश मिळवले. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभेलाही राष्ट्रवादीने 2014 च्या निवडणुकीत सातार्‍यात दणदणीत यश मिळवले. मात्र, गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. पवार साहेबांचा विचार मानणारे आता अमित शहा आणि मोदीजींचा विचार करु लागले आहेत. कश्मिरातील 370 तसेच 35 अ कलम हटवल्यानंतर सातार्‍यातील रस्त्यांवर चंद्रविलासमधील लाडू वाटून शिलेदारांनी जल्लोश साजरा केला. 

कधीकाळी हेच चंद्रविलासमधील लाडू जिल्हा बँकेतील अँटी चेम्बरमध्ये शरद पवारांना भरवले जात. परंतू घर बदलले की, घराचे वासेही बदलले जातात. निष्ठा आणि प्रतिष्ठा या वाड्याच्या तुळईला बांधल्या जातात. राष्ट्रवादीचे सातारा-जावलीचे आ. शिवेंद्रराजे यांनी परवा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रांगेत उभे राहून भाजपमध्ये प्रवेश मिळवला. सातार्‍यातील छत्रपतींनीच गेल्या 20 वर्षांची वहिवाट मोडल्यामुळे फलटणमधील नाईक-निंबाळकरांमध्येही राजकीय घुसमट सुरु झालेली आहे. ज्या शरद पवारांनी गेल्या 20 वर्षामध्ये पसा-पसा भरुन दिले, ते एकाच झटक्यात संपविण्याचा विडा विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उचललेला आहे. पवार साहेबांचा शब्द प्रमाण मानणारे मिस्टर रामराजेसुद्धा भाजपच्या मार्गावर असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. 2014 साली राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे संस्थान खालसा झाल्यानंतर पवारांनी विधान परिषदेतील संख्याबळाच्या आधारावर कॉंग्रेसचे तत्कालीन विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावर अविश्‍वास ठराव आणला आणि आपल्या लाडक्या मिस्टर रामराजेंना सभापती पदावर बसवले. त्यानंतर त्या पदावर बसून मिस्टर रामराजेंनी केलेल्या गंमती-जमती हा खरेतर वेगळा विषय आहे. (यावर सविस्तर लिहिले जाईलच.) मात्र आधी सेल्फी या विषयावर खल झालाच पाहिजे.

पूर्वी फलटण-खंडाळा विधानसभा मतदारसंघ होता. 1995 सालच्या निवडणुकीत अपक्ष असणार्‍या मिस्टर रामराजेंना खंडाळ्यातून मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे दिवंगत अविनाश धायगुडे सोडल्यास मिस्टर रामराजेंचा खंडाळ्यातील स्थानिक पुढार्‍यांशी याराना होता. हा याराना गेली 20 वर्षेही टिकून आहे. मात्र या मिस्टर रामराजेंच्या दोस्त-यारांनी भुईंजच्या मदन भोसलेंची करंगळी पकडून भाजपात प्रवेश केलेला आहे. एरव्ही सत्कार समारंभात सत्कारमुर्तींकडे न बघता फोटो काढणारे मिस्टर रामराजे याच खंडाळ्यातील कार्यकर्त्यांबरोबर सेल्फी काढत असल्याचे चित्र काल सोशल मीडियावर प्रसारित झाले. हे चित्र बघितल्यानंतर अनेकांना आश्‍चर्यही वाटले आणि हसूही आले. कधीकाळी सेल्फी देणारे मिस्टर रामराजे आज सेल्फी कशासाठी काढत आहेत, हे एव्हाना अनेकांच्या लक्षातही आले. मात्र फलटणची सुभेदारी भाजपने माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना दिलेली आहे. विधान परिषद उप सभापतीपद शिवसेनेकडे आहे. आपले पद वाचविण्यासाठीच मिस्टर रामराजे भाजपात प्रवेश करीत आहेत, हे आता सुर्यप्रकाशाइतके नितळ झालेले आहे. जरी मिस्टर रामराजेंनी भाजपात प्रवेश केला, तरी मिस्टर रामराजेंना रणजितसिंहांचे मांडलिकत्व पत्करावे लागणार आहे, हेही तितकेच खरे आहे. 

शेवटी प्रश्‍न निष्ठेचा असतो. ज्या शरद पवारांनी मिस्टर रामराजेंवर विश्‍वास टाकला, मंत्रीपदे दिली, मानसन्मान दिला. सत्तेत नसतानाही राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचे सभापतीपद दिले. मग अशा पवारांनाच हयातीतच मिस्टर रामराजे कृतघ्नतेचे चटके देणार काय? या एकाच विचारामुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीजनांच्या मनामध्ये आग लागलेली आहे. गेल्या आठवड्यापासूनच जाणार, जाणार अशा चर्चांना ऊत आलेला आहे. परंतू जाणे न जाणे शेवटी मिस्टर रामराजेंच्या हातात आहे. त्यांच्या जाण्याने किंवा येण्याने फारसा कोणाला फरक पडत नसावा. फलटणची विधानसभेची जागा शिवसेनेची आहे. मिस्टर रामराजे भाजपात, तर त्यांचा विद्यमान आमदार शिवसेनेत असे चित्रही येणार्‍या काळामध्ये फलटण तालुक्यात दिसू शकते. परंतू शेवटी ते शरद पवार आहेत. गुरु चेल्याला कधीच आपला हुकूमी डाव शिकवत नाही. वेळ आल्यास हाच गुरु चेल्याला अस्मानही दाखवू शकतो. त्यामुळे येणार्‍या काळामध्ये सातारा जिल्ह्याच्या राजकीय आखाड्यात अनेक निकाली कुस्त्या पहायला मिळणार आहेत. या कुस्त्यांमध्ये कोण-कोणाला अस्मान दाखवणार, हे येणार्‍या काळामध्ये समजणार आहे. मात्र मिस्टर रामराजेंच्या सेल्फीने कोण सेल्फीश आहे, हे जिल्हावासियांना कळून चुकले आहे.

- संग्राम निकाळजे.Very good.


Mangesh mohanrao kadam

Good


Mangesh mohanrao kadam

Good


खा. उदयनराजेंच्या देवेंद्रास्त्रामुळे जिल्ह्यातील भाजपेच्छुकांच्या भ्रुणहत्त्या

सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्री. छ. उदयनराजे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा या निवासस्थानावर भेट घेवून राष्ट्रवादीतून भाजपच्या वाटेवर असणार्‍या अनेकांना जोरदार चपराक दिली आहे.

21 August 2019 at 02:52

पश्चिमेकडे अतिपावसाने धुळधान; तर पूर्वेकडे पाऊस नसल्याने दाणादाण

गेले काही दिवस सांगली, कोल्हापूरप्रमाणेच सातारा जिल्हादेखील महापुरामुळे राज्यासह देशात चर्चेत आहे. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराच्या तडाख्याने कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले ही वस्तुस्थिती आहे.

19 August 2019 at 00:07