RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

जिहे-कठापूर योजना आता स्व. लक्ष्मणराव इनामदार जलसिंचन योजना’ या नावाने ओळखली जाईल : गिरीष महाजन

01 October 2018 at 00:33

जनता आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भुलथापांना बळी पडणार नाही : चंद्रकांतदादा पाटील

कोरेगाव : गुरुवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार या खटावच्या सुपुत्राने केलेल्या सुसंस्कारामुळे या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखा जागतिक नेता मिळाला. त्यामुळे रखडलेली माण-खटाव तालुक्यांची रक्तवाहिनी जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना पुढील काळात ‘गुरुवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार जलसिंचन योजना’ या नावाने शासनदरबारी ओळखली जाणार आहे. त्यामुळे शासनाची आणि आमची जबाबदारी आता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे गुरु स्व. लक्ष्मणराव इनामदार-वकीलसाहेब यांच्या नावाला कमीपणा येवू न देण्यासाठी येणार्‍या दीड वर्षात या योजनेसाठी संपूर्ण आर्थिक निधी देवू. जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना सर्वशक्तीनिशी आम्ही मार्गी लावू. माण-खटाव तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी कायमस्वरुपी पाणी देवून दुष्काळाचा कलंक कायमचा संपवून टाकू, असा निर्धार राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी खटाव येथील शेतकरी मेळाव्यात व्यक्त केला.

खटावचे सुपुत्र स्व. लक्ष्मणराव इनामदार यारंच्या जन्मशताब्दी निमित्त भाजपाचे युवा नेते महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खटाव येथील गौरीशंकर कॉलेज मैदानावर रविवारी सकाळी आयोजित मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या स्वप्नपूर्ती सोहळयाचे आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजयकाका पाटी, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, सदाशिव खाडे, मकरंद देशपांडे, भरत अमळकर, महेश शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

महाजन म्हणाले, युती शासनाच्या काळात जलसिंचनाच्या कामांना सुरुवात केली. मार्च 1999 अखेर धरणांची कामे पूर्ण करुन पाणी अडविण्याचे काम पूर्ण झाले. मात्र सन 1999 साली युती सरकार सत्तेतून गेले. त्यानंतर 2014 पर्यंत राज्यात सत्तेवर राहिलेल्या राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी शासनाने निधी अभावी जलसिंचन योजनांची कामे पूर्णत्वास नेली नाहीत. 15 वर्षांच्या कार्यकाळात जलसिंचन योजना अपूर्ण ठेवून 50 हजार कोटींच्या नवीन कामांना मंजूरी देवून त्यामधून राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कोट्यवधी रूपयांचे कमिशन मिळवले, असा घणाघात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी केला. 

मंत्री महाजन पुढे म्हणाले, आमची भाजपा-सेना युतीची सत्ता 2014 साली येताच राज्य शासनाच्या माध्यमातून जलसिंचनासाठी 8 हजार कोटीची तरतूद केली. राज्यातील सिंचनाच्या 225 कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देवून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला. देशाचे जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून केंद्रीय जल आयोग, बळीराजा जलसिंचन या माध्यमातून राज्यातील सर्व अपूर्ण सिंचन योजनांना 40 हजार कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. अनेक सिंचन योजनांना पर्यावरण, वनखाते यासह इतर अनेक परवानग्या मिळवून दिल्या आणि सिंचन कामातील अडथळे दूर केले. जिहे-कठापूर योजनेलाही केंद्रीय जल आयोगाची मान्यता देवून तिचा समावेश केंद्राच्याच बळीराजा योजनेतंर्गत झाल्याने या योजनेतील निधीचे सर्व अडथळे दूर झाले आहेत. जिहे-कठापूर योजनेवर आजअखेर 375 कोटी रूपये खर्च झाले असून उरलेले 850 कोटी रूपये येत्या दीड वर्षात शासनाकडून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे माण-खटाव तालुक्यातील 70 हजार एकरावरील शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. आणि दुष्काळाचा कलंक कायमचा पुसला जाणार असल्याचा विश्‍वास गिरीष महाजन यांनी यावेळी व्यक्त केला. शासनाने नुकताच एक निर्णय घेतला असून शेतकर्‍याच्या शेतीच्या एकूण वीजबिलापैकी 81 टक्के वीजबिल आता शासन भरणार आहे. केवळ 19 टक्के वीजबिलच शेतकर्‍याला भरावे लागणार आहे. राज्यातील शेतकरी कसा सुखी होईल, याचाच विचार आम्ही करत आहोत असे विचार गिरीष महाजन यांनी उपस्थित शेतकर्‍यांच्या समोर व्यक्त केले. 

राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माण-खटाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेतीसाठी असणारी जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना केंद्रीय जलआयोगाच्या मान्यतेमुळे पुढील दीड वर्षाच्या कालावधीत पूर्ण होईल, असे सांगितले. गेल्या 15 वर्षातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी शासनाच्या काळातील निधीअभावी रखडलेले 26 प्रकल्प आम्ही पुरेसा निधी उपलब्ध करून पूर्ण करणार आहोत. स्वामिनाथन आयोगाने शिफारशी केलेल्या शेतमालाच्या हमी भावाच्या बहुतांशी मागण्या केंद्रशासनाने आणि राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केल्या असल्याची माहितीही चंद्रकांतदादांनी यावेळी दिली. विरोधक सैरभैर झाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढण्याच्या भाषा बोलू लागल्या आहेत. मात्र जनता आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भुलथापांना बळी पडणार नाही. दळणवळणाने चांगले रस्ते, शेतीसाठी पाणी कोणी दिले हे जनता ओळखून आहे. घोडमैदान लांब नाही. हिम्मत असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीने वेगळे वेगळे लढून दाखवावे असे आवाहन ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी सहकार परिषदेने अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, माजी आमदार दिलीप येळगावकर, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष संजयकाका पाटील, युवा नेते महेश शिंदे, भरत अमळकर यांची भाषणे झाली.

रहायचे मुंबईत, व्यवसाय-उद्योगधंदे मुंबईत करायचे आणि नेतृत्व कोरेगाव-खटावचे करायचे अशांचे नेतृत्व मानू नका. सहा-सहा महिने कोरेगाव-खटाव मतदार संघात न दिसणार्‍या नेतृत्वाला कायमचे घरी बसवा अशी बोचरी टीका गिरीष महाजन यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर नामोल्लेख न करता यावेळी केली.गेली 65 वर्षे सत्तेत्त राहून आमच्या माण, खटाव, कोरेगाव तालुक्याला दुष्काळाच्या खाईत ढकलणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला येणार्‍या निवडणूकीत कायमचा धडा शिकवायचा आहे. कोरेगाव-खटाव मतदार संघातील घड्याळाची टिकटिक बंद करुन तिथे कमळ फुलवायचे आहे. जिहे-कठापूर, वसना-वांगणा सिंचन योजना पूर्ण करुन इंच ना इंच शेतजमिन पाण्याखाली आणायची आहे, असा निर्धार व्यक्त करुन केंद्रीय जलआयोगाची मान्यता जिहे-कठापूर योजनेला मिळवून दिल्याबद्दल युवा नेते महेश शिंदे यांनी उपस्थित मंत्री महोद्याचे यावेळी आभार मानले.

स्व. लक्ष्मणराव इनामदार यांच्या स्मरणिकेचे प्रकाशन ना. चंद्रकांतदादा पाटील, ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. भाजपात प्रवेश केलेल्या अनेक कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मोठ्या संख्येने सातारा, कोरेगाव, खटाव तालुक्यातून शेतकरी, ग्रामस्थ आणि युवक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.     

Umesh Bagal

Give regular shedulwise water to Man and khatav


जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

नलवडे (बिचुकले), ता. कोरेगाव येथील वाडगं तथा मोरदरा नावाच्या शेतशिवारातील जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचा कंत्राटी कामगार जागीच ठार झाला.

1 hour before

फलटण येथील दत्त नगर येथे महिलेचा खून

दत्त नगर, चौधरवाडी ता. फलटण येथील हेमंत निंबाळकर यांच्या शेतातील घरात रहात असलेल्या महिलेचा अज्ञाताने खून केल्याची घटना घडली असून अरीफा रशीद शेख (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

13 hours before

इथिओपियाचा फिक्रू अबेरा दादी प्रथम

ढगाळ वातावरण... यवतेश्वर घाटातील धबधबे ...रस्त्यावर आलेले ढग ... अशा आल्हाददायी वातावरणात आज सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे

13 hours before

खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांना दि.२६ ते ३१ आँगस्ट कालावधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात क्रांतीज्योती अंतर्गत महिला सदस्यांना दि.२६ ते २८ आणि पुरुष सदस्यांना दि.२८ ते ३१ आँगस्ट या

13 hours before