03:36pm | Jul 14, 2018 |
सातारा : एकेकाळी तिकिटबारीवर तासन्तास उभे राहून तिकिट काढणारा सातारकर मोबाईलमुळे आणि इंटरनेटमुळे भलताच फॉरवर्ड झालेला आहे. मोबाईल फोनमध्ये जिओचे सीमकार्ड टाकल्यानंतर सातार्यातील अनेकजण 24 तास ऑनलाईन दिसू लागले. त्यामुळे सातार्यातील केबल ऑपरेटरच्या मनमानीमुळे मोडकळीस आलेल्या स्थानिक वृत्तवाहिन्यांनाही यू ट्यूबच्या माध्यमातून सातारकर पाहू लागले आहेत. यू ट्यूबचा बोलबाला चालू असतानाच ‘नेटफ्लिक्स’ ऑनलाईन वेबसिरीज आणि चित्रपट दाखविणार्या (फुकटात नाही) साईटवर केवळ एका वेबसीरीजमुळे उड्या पडू लागल्या आहेत. ही वेबसीरीज म्हणजे ‘‘स्केअर्ड गेम्स’’. गेल्या अनेक दिवसांपासून भारतासह विदेशातील लोकांना याची प्रतिक्षा होती. अखेर ती ‘नेटफ्लिक्स’वर उपलब्ध झाल्यामुळे देशभरातील लोकांसह सातारकरांच्याही उड्या ‘नेटफ्लिक्स’वर पडलेल्या आहेत. 500 ते 800 रुपयांचे सबस्क्रिप्शन घेवून ‘स्केअर्ड गेम्स’ सह अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपट पाहण्यात सातारकर दंग झालेला आहे.
पूर्वी कृष्णधवल आणि रंगीत दूरचित्रवाणीवर रामायण, महाभारत या पौराणिक मालिकांची चलती होती. दूरचित्रवाणी संचाच्या कमी उपलब्धतेमुळे ज्याच्या घरामध्ये दूरचित्रवाणी संच आहे, त्याच्या घरात सिनेमागृह असल्याचा भास त्याकाळी व्हायचा. हळूहळू टीव्हीची संख्या वाढल्यामुळे सार्वजनिक चित्रपटगृह ही संकल्पना पाठी पडू लागली. त्यानंतर केबलचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर देश-विदेशातील अनेक चॅनल्स घरबसल्या टीव्हीवर पहायला मिळू लागले. साहजिकच चित्रपटगृहांकडे पाठ फिरवल्यामुळे अनेक चित्रपटगृहे बंद पडली. 14 इंचापासून 32 इंचापर्यंतचा टिव्ही भारतीय रसिकांना रिझवू लागला. जाहिरातींचा भडिमार असला तरी तासन्तास डोळ्यात प्राण आणून भारतीय रसिक टिव्हीवरील मालिका, चित्रपट, क्रिकेट सामने पाहू लागला. इंटरनेट ही संकल्पना भारतात येण्या अगोदर टिव्हीचाच बोलबाला होता. जसजसे इंटरनेटने आपले पाय भारतात पसरायला सुरुवात केली, तसतशी लोकांची ओढ टिव्ही पेक्षा कॉम्प्युटरकडे होवू लागली. यू ट्यूब, टोरंटच्या माध्यमातून अनेक चित्रपट सहज डाऊनलोड करता येवू लागले. त्यामुळे साहजिकच टिव्हीसाठी वेडा असलेला माणूस इंटरनेटच्या जाळ्यात अडकून पडला. कॉम्प्युटरबरोबरच बाजारात मल्टिमिडिया मोबाईलही आले. त्यात विविध मोबाईल सेवा कंपन्यांनी इंटरनेटचे दर कमी केल्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉटसऍप, यू ट्यूब, ट्विटर, फेसबुक यांसारखी ऍप्लिकेशन्स डाऊनलोड होवू लागली.
ऍमेझोनची फायर स्टिक टिव्हीला जोडल्यानंतर हजारो चित्रपट एका सेकंदात टिव्हीच्या स्क्रिनवर बघण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र त्याच पद्धतीची सेवा ‘नेटफ्लिक्स’ने ऑनलाईन सुरु केल्यामुळे 1940 पासून ते आजपर्यंतचे कृष्णधवल, इस्टमनकलर चित्रपट आपण लाखोंच्या संख्येने पाहू शकतो. अनेकांना ‘नेटफ्लिक्स’ काय भानगड आहे, हे आजपर्यंत माहित नव्हते. 1997 साली ‘नेटफ्लिक्स’ कंपनी चित्रपटाच्या वितरणामध्ये होती. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये ‘नेटफ्लिक्स’चे मुख्यालय आहे. रिड हास्टिंग्स आणि मार्क रेंडॉल्फ या द्वयींनी सुमारे 20 वर्षापूर्वी या कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी चित्रपट वितरणामध्ये संपूर्ण अमेरिकेत डंका वाजवला होता. कालानुरुप त्यांनीही आपल्या कार्यपद्धतीत बदल करीत बदलत्या जमान्याबरोबर ऑनलाईन प्रक्षेपणाकडे मोर्चा वळवला. आज ‘नेटफ्लिक्स’ ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. डिव्हीडी आणि ब्लू रेज सिरीज हीसुद्धा ‘नेटफ्लिक्स’चीच देणगी आहे. आज भारतीय भाषांमध्ये निर्माण होणार्या चित्रपट, वेब सिरीज, शॉर्ट फिल्मसाठी ‘नेटफ्लिक्स’ हे हक्काचे व्यासपीठ तयार झालेले आहे. 2017 च्या उत्तरार्धात सैफ अली खान आणि गुणवान अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी अभिनित ‘स्केअर्ड गेम्स’च्या थरारक वेब सिरीज ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार असल्याची माहिती रसिकांना लागल्यामुळे याबद्दलची उत्कंठा दाटली होती.
अखेर 6 जुलै 2018 रोजी ‘स्केअर्ड गेम्स’चे आठ भाग प्रदर्शित झाले आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवणे या द्वयींनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. सैफ अली खान, राधिका आपटे, नवाझुद्दिन सिद्दीकी, सुर्वीण चावला, राजेश देशपांडे, अनुप्रिया गोयंका यांनी या वेबसिरीजमध्ये दमदार अभिनय केला आहे. मुंबईच्या अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारीच्या कथानकावर गुंफलेली ही वेब सिरीज 90 च्या दशकातील आणि सद्य स्थितीतील गुन्हेगारीवर या सिरीजच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आहे. नवाझुद्दिन सिद्दीकी यामध्ये गुन्हेगाराच्या भूमिकेत आहे, तर सैफ अली खानने यामध्ये एका पोलीस अधिकार्याची भूमिका साकारलेली आहे. 25 दिवसांत मुंबईमध्ये मोठा धमाका होणार आहे. या 25 दिवसांवर आधारित या वेबसिरीजचे कथानक बेतलेले आहे. रॉ, आयबी, सीबीआय, मुंबई पोलीस या सर्व प्रकरणाचा कसा तपास करतात, यावर या वेब सिरीजच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. मात्र, अतिशय खालच्या दर्जाची भाषा, प्रत्येक डायलॉगमध्ये शिवी, अश्लिलता या सर्वच गोष्टींमुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच या ‘स्केअर्ड गेम्स’च्या ‘नेटफ्लिक्स’वरील हिंदी सिरीजचा बोलबाला वाढलेला आहे. 1 जुलैपर्यंत ‘नेटफ्लिक्स’चे भारतात सुमारे 5 लाख सबस्क्राईबर्स होते. मात्र, ‘स्केअर्ड गेम्स’ ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झाल्यानंतर हाच आकडा दुप्पट झाला आहे. सातारा जिल्ह्यातही हजारोंच्या संख्येने लोकांनी ‘नेटफ्लिक्स’चे सबस्क्रिप्शन घेतले असल्याचा दावा आयटी क्षेत्रातील तज्ञांनी केला आहे.
- संग्राम निकाळजे
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |