06:29pm | Feb 09, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यात दबलेल्या सावकारांनी व फायनान्सवाल्यांनी पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली असून काल दि. 8 रोजी वडूज, ता. खटाव येथील एका वृद्धाने खासगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्त्या केल्याची घटना समोर आली आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व संदीप पाटील यांनी ठेचलेल्या सावकारांनी आपले उपद्रवमूल्य पुन्हा दाखवायला सुरुवात केल्यामुळे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना खासगी सावकार व फायनान्स वाल्यांची विषवल्ली ठेचावीच लागणार आहे. नाहीतर येणार्या काही दिवसांमध्ये सातारचा क्राईमरेट बिहारलाही लाजवेल, अशा पद्धतीने वाढणार आहे.
17 ऑगस्ट 2018 रोजी होळ, ता. फलटण येथील तत्कालीन उपसरपंच विनोद भोसले यांनी फलटणमधील खासगी सावकारांच्या मानसिक, शारीरिक व आर्थिक छळाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्त्या केली होती. एका उपसरपंचाने खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्त्या केल्यामुळे फलटण तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. ‘सातारा टुडे’च्या दणक्यामुळे या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक झाली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन खासगी सावकारी करणार्या अनेक धेंडांना गजाआड केले होते. त्यामुळे फलटणमधील अवैध खासगी सावकारी काही काळ बंद झाली होती. फलटणमधील सोमवार पेठ हा अवैध खासगी सावकारीचा गड आहे व होताही. सातारा टुडे ने या गडाला सुरुंग लावत स्वत:ला अण्णा समजणार्या कात्याभाईला घराच्या बाहेर पडणे मुश्किल केले होते. संदीप पाटील यांच्या बदलीनंतर जिल्ह्याला 'दळगा' कारभारी लाभला. त्यामुळे जिल्ह्यातील सावकारांनी पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. प्रमोद उर्फ खंड्या धाराशिवकर हा सातार्यातील अवैध खासगी सावकारीतील मुकूटमणी. सध्या मोक्का कायद्यांतर्गत न्यायालयीन कोठडीत आहे. असे असतानाही खंड्याचे हाल बघून इतर सावकारांनी हाय खाण्यापेक्षा त्यांनी उचलच खाल्लेली दिसते. काल वडूज येथे घडलेली घटना ही मस्तवाल झालेल्या खासगी सावकारीचे प्रतिकच मानावे लागेल.
पुसेसावळी, ता. खटाव येथील संजय किसन जाधव उर्फ भैय्या याच्याकडून पांडुरंग उर्फ दादासो ज्ञानदेव यादव (वय 70) यांचा मुलगा विजय पांडुरंग याने दहा टक्के व्याजाने सुमारे चार लाख रुपये घेतले होते. तसेच संजय जाधव याने पांडुरंग यादव यांच्याकडून साडेचार लाख रुपयांचे बेअरर चेक घेतले होते. मुद्दलीसह 72 हजार रुपये व्याज देऊनही संजय जाधव याने पांडुरंग यादव यांच्याकडून दमदाटी करुन वडूज येथील त्यांची 21 लाख रुपये किंमतीची 0.4 हेक्टर जमीन गिळंकृत केली होती. तरीही संजय जाधव याची हाव पूर्ण झाली नव्हती. अखेर पांडुरंग यादव यांच्यासह त्यांचा मुलगाही सावकारीच्या पाशात अडकून गेला होता. यासंदर्भात यादव कुटूंबियांनी सातारा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व वडूज पोलीस ठाण्यात या सावकारांच्या विरोधात तक्रारी अर्ज केले होते. मात्र पोलिसांनी यासंदर्भात कोणतीही दखल न घेतल्याने व सावकारांचा दुसर्या बाजूने तगादा लागल्याने अखेर पांडुरंग यादव यांनी शनिवार दि. 8 रोजी झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केली. खासगी सावकारांच्या छळामुळे एका वृद्धाने आत्महत्त्या केल्याने वडूज परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. गुन्हा दाखल होण्यासाठी जीव दिला तरच गुन्हा दाखल करुन घेतात, हे आता वडूज येथील घटनेनंतर प्रकर्षाने दिसू लागले आहे.
दरवर्षी खासगी सावकार सातार्यात असे अनेकांचे बळी घेतात. जिल्ह्यात दुष्काळामुळे आणि बेरोजगारीमुळे खासगी सावकार व फायनान्स कंपन्यांचे फावलेले आहे. पारंपारिक खासगी सावकार तर आहेतच. त्यात भरीस भर म्हणून खासगी फायनान्स कंपन्यांवाले उतरलेले आहेत. विविध प्रलोभने दाखवून खासगी फायनान्सवाले नडलेल्या ग्राहकाला आपल्या जाळ्यात ओढतात. परंतू खासगी सावकार व फायनान्सवाल्यांची मुद्दल कधीच फिटत नाही. शंभर टक्के चक्रवाढ व्याज लावून संबंधिताचे असेल नसेल ते ओरबडून घेतात. या खासगी सावकार व फायनान्सवाल्यांना आतापर्यंत राजकीय पुढार्यांचे अभय मिळालेले आहे. एखाद्या सावकार वा फायनान्स विरोधात पोलीस ठाण्यात अर्ज केल्यास क्षणार्धातच सेटलमेंट होते. खुर्चीवर बसलेला ठाणेदार बंडलांचे पुडके खिशात ठेवून त्या तक्रारअर्जाला 'डस्टबीन' दाखवतो. त्यामुळे पोलिसांच्या पुचाट कार्यशैलीमुळे जिल्ह्यातील खासगी सावकार व फायनान्सवाले शेफारलेले आहेत. कराड, फलटण व माण-खटाव तालुक्यात या अवैध खासगी सावकार व फायनान्सवाल्यांनी उच्छाद मांडलेला आहे. अनेक खासगी फायनान्सवाल्यांनी याठिकाणी आपली मोठमोठाल्ली दुकाने थाटली आहेत. आम्हाला सेबी आणि रिझर्व्ह बँकेची मान्यता आहे, अशी भलावण करुन हे खासगी सावकार अनेक अडले-नडलेले सावज आपल्या गळाला लावतात. विशेषत: महिलांना अनेक प्रलोभने दाखवून त्यांनी ग्रामीण भागात बचत गट तयार केले आहेत. एका महिलेला दुसरी महिला जामीनदार करुन खासगी फायनान्सवाल्यांनी मोठी साखळी निर्माण केली आहे. आठवड्यातील एक वार ठरवून त्यादिवशी हे खासगी फायनान्सवाले आपल्या मुद्दलेचे सव्याज वसूल करीत असतात. एखाद्या महिलेने एखादा हप्ता भरला नाही तर त्या बचत गटातील सर्व महिलांना एका खोलीत बंद करुन ठेवले जाते. हप्ता भरला तरच त्या महिलांची सुटका होते. अशापद्धतीने हे खासगी फायनान्सवाले अनेक महिलांचे आर्थिक व मानसिक शोषण करतात. या खासगी फायनान्स कंपन्यावाल्यांवर स्थानिक पुढारी, पोलीस व स्थानिक गुंडांचा वरदहस्त असल्यामुळे या खासगी फायनान्स कंपन्यावाल्यांच्या भानगडी पोलीस अधीक्षक तसेच सक्षम यंत्रणेपर्यंत अद्याप पोहोचलेल्या नाहीत. याबाबतच्या अनेक तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात येवूनही याबाबतचे गुन्हे दाखल करुन न घेतल्यामुळे खासगी फायनान्सवाल्यांचे कराड, माण-खटाव आणि विशेषत: फलटण तालुक्यात शोषण सुरु आहे.
दुसरीकडे दुचाकी तसेच चारचाकी फायनान्सवाले कायदा हातात घेवून भररस्त्यात वाहनचालकाची वाटमारी करीत असतात. गेल्या आठवड्यात ‘सातारा टुडे’ने या विषयाकडे सातारा पोलिसांचे लक्ष वेधले होते. परंतू पोलिसांनी अद्याप याबाबत कडक पावले न उचलल्यामुळे खासगी फायनान्सवाल्यांच्या वाहनधारकावर होणार्या वाटमार्या अद्याप सुरुच आहेत. जिल्ह्यात काल अवैध खासगी सावकारांनी दुसरा बळी घेतलेला आहे. भविष्यात खासगी सावकार, फायनान्सवाले तसेच बचतगट फायनान्सवाल्यांची विषवल्ली ठेचली नाही तर ही विषवल्ली जिल्ह्याला पोखरुन काढणार आहे. आतापर्यंत आर्थिक व्यवहारातून सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत आलेली आहे. गुंडगिरीतून पैसा, त्या पैशातून राजकारण आणि त्या राजकारणाच्या माध्यमातून पुन्हा गुंडगिरी, हे चक्र सातारा जिल्ह्यात अव्याहतपणे सुरु आहे. सातारा जिल्ह्यात तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि संदीप पाटलांप्रमाणे कायद्याचे राज्य आणावयाचे असल्यास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना अवैध खासगी सावकारी मोडून काढण्यासाठी 'दंडुका' घेवूनच रस्त्यावर उतरावे लागणार आहे. तर आणि तरच सातारा जिल्ह्यातील अवैध खासगी सावकारी व फायनान्सची विषवल्ली मुळापासून उखडली जाणार आहे.
- संग्राम निकाळजे
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |