RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

मुंबई इंडियन्स चौथ्यांदा चॅम्पियन

13 May 2019 at 13:52

चेन्नई सुपरकिंग्सवर एका धावेने थरारक विजय

हैदराबाद : आयपीएलच्या 12 व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करून आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. हैदराबादच्या रणांगणातल्या या सामन्यात मुंबईने चेन्नईला विजयासाठी 150 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईचा संघ केवळ 148 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

शेन वॉटसनने तीन जीवदानांचा लाभ उठवून 80 धावांची तुफानी खेळी केली आणि चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. सामना संपायला दोन चेंडू असताना वॉटसन धावचीत झाला आणि सामन्याला पुन्हा कलाटणी मिळाली. चेन्नईला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर केवळ दोन धावांची आवश्यकता होती. लसिथ मलिंगाने त्या चेंडूवर शार्दूल ठाकूरला पायचित करून, मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 20 षटकांत 8 बाद 149 धावांचीच मजल मारता आली. हैदराबादमधल्या या सामन्यात क्विन्टन डी कॉक आणि रोहित शर्माने मुंबईला पाच षटकांत 45 धावांची सलामी दिली होती. शार्दूल ठाकूरने डी कॉकला माघारी धाडून ही जोडी फोडली आणि मुंबईच्या डावाला घरघर सुरु झाली. मुंबईची एक बाद ४५ धावांवरून १५ षटकांत पाच बाद 102 अशी घसरगुंडी उडाली. त्या परिस्थितीत कायरन पोलार्डने 25 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 41 धावांची खेळी उभारून मुंबईच्या डावाला आकार दिला.