RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

हॉकी विश्वचषकात भारताची विजयी सलामी, आफ्रिकेचा 5-0 ने धुव्वा

29 November 2018 at 14:29

भुवनेश्वर : भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 5-0 असा धुव्वा उडवून हॉकी विश्वचषकात विजयी सलामी दिली. मायदेशात खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने, विश्वचषक स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. उभय संघांमधला विश्वचषकाच्या क गटातला सामना भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताच्या सिमरनजीतसिंगनं 43 व्या आणि 46 व्या मिनिटाला असे दोन गोल्स लगावले. मनदीपसिंगनं दहाव्या, आकाशदीपसिंगनं बाराव्या आणि ललित उपाध्यायनं 45 व्या मिनिटाला प्रत्येकी एकेक गोल केला.

तुलनेने नव्या खेळाडूंसह मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पहिल्या सामन्यात फारशा आव्हानाचा सामना करावा लागला नाही.  10 व्या मिनीटाला मनदिप सिंहने पेनल्टी कॉर्नरवर तयार झालेल्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करुन भारताला सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर 12 व्या मिनीटाला आकाशदीप सिंहने बॉलला गोलपोस्टची दिशा दाखवत पहिल्या सत्राअखेरीस भारताची आघाडी 2-0 अशी भक्कम केली.

दुसऱ्या सत्रात भारताने सामन्यात 2-0 अशी आघाडी कायम राखली. तिसऱ्या सत्रात 43 व्या मिनीटाला मनदीप सिंहने दिलेल्या पासला सिमरनजीत सिंहने हलकेच गोलपोस्टची दिशा दाखवून भारताची आघाडी 3-0 ने वाढवली. पाठोपाठ 45 व्या मिनीटाला आकाशदीपच्या पासवर ललित कुमार उपाध्यायने सुरेख मैदानी गोल करत संघाला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली.

चौथ्या सत्राच्या सुरुवातीला भारताला पेनल्टी कॉर्नरवर संधी मिळाली. याचा पुरेपूर फायदा उचलत सिमरनजीतने 46 व्या मिनीटाला भारताची आघाडी 5-0 ने वाढवली. हॉकीच्या जागतिक क्रमवारीत भारत पाचव्या आणि दक्षिण आफ्रिका पंधराव्या स्थानावर आहे. भारताचा पुढचा सामना बेल्जियमविरुद्ध होणार आहे.