RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

माढ्यासाठी जिल्हा कॉंग्रेस आग्रही

12 March 2019 at 16:07

दुपारी कराडात होणार्‍या बैठकीकडे फलटणसह माण-खटावचे लक्ष

सातारा : पुणे येथे काल बारामती हॉस्टेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माढ्यातून मी लढणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली तलवार म्यान केली होती. पवारांच्या या नीतीमुळे भल्याभल्यांना घाम फुटला होता. माढ्यातून पवार नाहीत, या एकाच चर्चेमुळे माढा मतदारसंघात येणार्‍या राष्ट्रवादीतील पुढार्‍यांनी पुन्हा एकदा गुढघ्याला बाशिंग बांधायला सुरुवात केल्यामुळे कालपासून एकच खल सुरु आहे. मात्र काल दुपारनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रीय कॉंग्रेसने माढ्यावर दावा सांगत सांगली हा पारंपारिक मतदारसंघ राष्ट्रवादीला ऑफर केला आहे.

दरम्यान, आज दुपारी कराड येथे होत असलेल्या कॉंग्रेसच्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेससाठी सोडण्यात यावा, अशी आग्रही मागणी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर माढ्याचा तिढा मात्र कायम आहे. काल पवारांनी माढ्यातून लढण्यास नकार दिल्यानंतर अनेक हौश्या-नवश्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील हे पवारांपश्‍चात आग्रही आहेत. असे असतानाच कालपासून कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये नाट्यमय घडामोडी सुरु झाल्या आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी सांगली कॉंग्रेसमधील अनेक दिग्गजांनी नकार दिला आहे. पलुस, कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांना सांगली लोकसभेसाठी पक्षश्रेष्ठींकडून विचारणा करण्यात आली होती. मात्र, मी दिल्लीत जावून माझे सांगली लोकसभेचे तिकिट कापले, अशी जाहीर कबुली डॉ. विश्‍वजित कदम यांनी दिली होती. त्यामुळे हा सांगली मतदारसंघ राष्ट्रवादीने घ्यावा, यासाठी कॉंग्रेसने चक्क राष्ट्रवादीसाठी रेड कार्पेट टाकले आहे. सांगलीच्या बदल्यात माढा मतदारसंघ एक्सचेंज करावा, अशी मागणी कॉंग्रेसमधून जोर धरु लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कोर्टात सांगली लोकसभेचा चेंडू आलेला आहे. जयंत पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ राजु शेट्टी इच्छुक असलेल्या शिरोळ लोकसभा मतदारसंघात येत असल्यामुळे हा मतदारसंघ राजु शेट्टींना अगोदरच देण्यात आलेला आहे. त्यामुळे सांगलीतून जयंत पाटलांसाठी कॉंग्रेससह राष्ट्रवादी अनुकूल असल्यामुळे माढा, सांगली एक्सचेंज होणार, ही फक्त आता औपचारिकता असल्याचे बोलले जात आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघावर आपला अधिकार सांगितलेला आहे. दलित मुस्लिम फॉर्म्युलानुसार सध्या प्रकाश आंबेडकरांचे सोलापुरात पारडे जड आहे. त्यामुळे भविष्यात हा मतदारसंघ कॉंग्रेसने वंचित आघाडीसाठी सोडल्यास कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यासाठी माढा लोकसभा सेफ झोन ठरणार आहे. पवार आणि सुशिलकुमार शिंदे यांची मैत्री सर्वश्रुत असल्यामुळे सुशिलकुमार शिंदेंच्या नावासाठी कॉंग्रेस माढ्यातून आग्रही आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नावही माढ्यामधून चर्चेत आहे. सुशिलकुमार शिंदे, की रणजितसिंह नाईक-निंबाळकर? हे कॉंग्रेसश्रेष्ठीच ठरवतील, अशी माहिती कॉंग्रेसच्या एका बड्या पदाधिकार्‍याने ‘सातारा टुडे’शी बोलताना दिली आहे.

आज दुपारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कराड येथील हॉटेल पंकज येथे कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून माढ्याबाबत रणजितसिंह नाईक-निंबाळकर तसेच जयकुमार गोरे आग्रही आहेत. त्यामुळे माढा, सांगली एक्सचेंज होणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का?

काल राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांनी तलवार म्यान केल्यानंतर माढ्यातून कोण? याबाबत बराच खल झाला. सालाबादप्रमाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनीसुद्धा माढ्याच्या तिढ्यात उडी घेतली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसे ‘कॅम्पेन’ही सोशल मिडियावर राबवायला सुरुवात केली आहे. फलटणमधून एक विधानपरिषदेचे सभापतीपद, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, आमदारकी, बाजार समितीचे चेअरमनपद, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ही सर्व पदे एकाच घरात देवूनसुद्धा परत माढ्याच्या उमेदवारीवर हक्क सांगितला जात असल्यामुळे माढा मतदारसंघात संतापाची लाट उसळली आहे. हेच का यशवंतराव चव्हाणांचे सत्तेचे विकेंद्रीकरण? असा सवालही माढा मतदारसंघातून केला जाऊ लागला आहे. तुम्हालाच मानाची आणि लाभाची पदे. मग कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या काय? असा सवालही माढ्यातील निष्ठावंत कार्यकर्ते करीत आहेत.

-संग्राम निकाळजे

मतमोजणीच्या पूर्वसंध्येला सातार्‍यात पोलिसांचे महासंचलन

उद्या होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर आज संध्याकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सातार्‍यातील मुख्य मार्गांवर हजारो पोलिसांनी महासंचलन केले. सातारा जिल्ह्यात मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था

21 hours before

सातार्‍यात आणि माढ्यात भूमिपुत्रांचाच डंका ?

तारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे श्री. छ. उदयनराजे भोसले हॅट्रीक करणार? की, माढा लोकसभा मतदारसंघातून फलटणचे भूमिपुत्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपचे कमळ फुलवणार?

21 hours before

श्री संतकृपा इंजिनिअरींगचा पुणे येथील विविध कंपन्यांशी सामजस्य करार

घोगांव ता.कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (बी टेक) या महाविद्यालया मध्ये प्रवेश घेऊन बाहेर पडणार्‍या अभियंत्यांसाठी संस्था विविध संकल्पना राबवत असते.

23 hours before

आ.बाळासाहेब पाटील यांची पाडळी येथील पारायण सोहळ्यास सदिच्छा भेट

गांवोगांवी होणार्‍या पारायण सोहळयांमुळे सात्वीक विचार व आचारांचा प्रचार होवून, सुसंस्कारीक युवा पिढी घडविण्यास मदत होत असून, 13 व्या शतकातील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या नामस्मरणाचा जप आजही तितक्याच भक्तिभावाने पारायण सोहळे, अखंड हरिनाम

23 hours before