05:49pm | Nov 07, 2018 |
सातारा : फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील सुपर मार्केट आवारातील गाळ्यांची भाडेवाढ केल्यामुळे गाळाधारकांनी ऐन दिवाळीत चक्री उपोषणाचे हत्यार उपसल्यामुळे ऐन हिवाळ्यात बाजार समितीच्या सभापतींसह संचालकांना घाम फुटलेला आहे. काल व आज सकाळी गाळेधारकांनी शेकडोंच्या संख्येने फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा निषेध करीत भल्या सकाळी रस्त्यावरच दिवाळीचे अभ्यंगस्नान केले. त्यामुळे आज जिल्हाभरात या अभिनव आंदोलनाची चर्चा आहे.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तुघलकी फतव्याविरुद्ध 5 नोव्हेंबरपासून सुमारे अडीचशे गाळेधारकांनी अवैधरित्या आकारण्यात आलेल्या भाडेवाढीच्या विरोधात फलटण संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंह निकम, शेतकरी संघटनेचे धनंजय महामुलकर, भाजपा नेते सुशांत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चक्री उपोषण सुरु केले आहे. ऐन दिवाळीत गाळेधारकांनी आपला व्यवसाय बंद ठेवल्यामुळे गाळाधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुमारे चाळीस वर्षापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असणार्या मोकळ्या जागेत तत्कालीन सभापती व पदाधिकार्यांनी व्यापारी गाळ्यांची उभारणी केली होती. त्यावेळी वीस हजार रुपये अनामत रक्कम घेवून तीनशे रुपये मासिक भाड्याने हे गाळे शेतकरी व व्यापार्यांना भाडेतत्वावर दिले होते. दि. 3 ऑक्टोबर 2017 व 10 ऑगस्ट 2018 रोजी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने ठराव घेवून 1 नोव्हेंबर 2017 पासून सुधारित भाडेवाढ व डिपॉझिटची आकारणी केली होती. मात्र ही नियमबाह्य व बेकायदेशीर भाडेवाढ गाळेधारकांना मान्य नसल्याचे फलटण संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंग निकम यांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना सांगितले.
बारामतीतील कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील अग्रेसर बाजार समिती म्हणून ओळखली जाते. मात्र बारामती बाजार समिती मालकीच्या असलेल्या गाळ्यांचे मासिक भाडे केवळ 500 रुपये आहे. तर सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांचे भाडे मासिक 350 रुपये आहे. या दोन्हीही बाजार समित्या फलटण बाजार समितीच्या कैक पटीने मोठ्या आहेत. असे असतानाही शेतकर्यांचे व गाळेधारकांचे हित लक्षात घेवून या दोन्ही बाजार समित्यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची भाडेवाढ केलेली नाही. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालकांनी केवळ मलिदा लाटण्यासाठी भाडेवाढ व अनामत रक्कम वाढविण्याचा घाट घातलेला आहे. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने या गाळाधारकांना कोणत्याही प्रकारच्या मुलभूत सोयीसुविधा दिलेल्या नाहीत. याठिकाणी साधे स्वच्छतागृहही नाहीत. बारामती बाजार समितीचे गाळे हे आरसीसी आहेत. मात्र गेल्या चाळीस वर्षापासून फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे गाळे केवळ पत्र्याचे आहेत. कोणत्याही सोयी-सुविधा न देता भाडेवाढीचा हा घाट कशासाठी, असा प्रश्न ऍड. नरसिंह निकम यांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना केला आहे.
महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या गाळ्यांना कोठेही एवढे भाडे नसतानाही फलटण बाजार समितीने तुघलकी फतवा काढून बेकायदेशीर भाडेवाढ केलेली आहे. जीएसटी व संकलित कर मिळून हे भाडे तब्बल 8 हजारांच्या वर जाणार आहे. त्यामुळे गाळेधारकांनी व्यवसाय करायचा की, सभापतींसह संचालकांच्या तुंबड्या भरायच्या? सुमारे चाळीस वर्षापूर्वी गाळे हस्तांतरणापूर्वी फलटण बाजार समितीकडून 20 हजार रुपये अनामतीपोटी घेण्यात आले होते. गेल्या चाळीस वर्षात त्या अनामत रकमेच्या मुद्दलेसह किती व्याज झाले, याचा हिशोबही सभापतींसह संचालक देणार काय? केवळ स्वत:चे घर भरण्यासाठी बाजार समितीमधील काही स्वार्थी लोकांनी राज्य पणन महामंडळ व राज्य शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर ठराव घेवून फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी ही बेकायदेशीर भाडेवाढ गाळेधारकांवर थोपविल्याचा आरोप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भाजप नेते सुशांत निंबाळकर यांनी केला आहे.
सहाय्यक निबंधक, फलटण यांनी या बेकायदेशीर भाडेवाढीला स्थगिती दिल्याची माहिती गाळेधारकांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना दिली असून फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींसह यामध्ये सहभागी असलेल्या संचालकांनी गाळेधारकांसह राज्य पणन महामंडळ व शासनाची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे सभापतींसह यामध्ये सहभागी असणार्या संचालकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंह निकम यांनी दिलेली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून येथील अधिकारगृहासमोर गाळेधारकांनी चक्री उपोषण सुरु केले असून काल व आज दीपावलीची पहिली आंघोळ रस्त्यावरच उटणे लावून फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा निषेध करुन करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची छि:थू झालेली आहे.
बाजार समितीला दिलेल्या बंदोबस्ताची चौकशी करणार
दि. 2 नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीने फलटण शहर पोलिस ठाण्यातून रितसर पोलीस बंदोबस्त मागवला होता. मात्र, बाजार समितीचे ठरावच बेकायदेशीर असल्याचे गाळेधारकांनी पोलिसांना सांगितले होते. पणन महामंडळ व राज्य शासनाचा कोणताही आदेश नसताना बाजार समितीने बेकायदेशीर ठराव घेवून पोलिसांना गाळ्यांचा ताबा घेण्यासाठी पाचारण केले होते. मात्र ही संपूर्ण प्रक्रियाच बेकादेशीर असताना पोलिसांनी बंदोबस्त कसा दिला, असा प्रश्न गाळेधारकांनी पोलिसांना विचारला. परंतू पोलीस जागचे हटले नाहीत. यावेळी ऍड. नरसिंह निकम यांनी जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांना याबाबत कल्पना दिल्यानंतर बंदोबस्तावरील पोलीस त्वरित निघून गेले. यानंतर ‘सातारा टुडे’ने जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत चौकशी करणार असल्याची माहिती दिली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |