RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

टीम इंडियाचा १५० वा कसोटी विजय ; मालिकेत आघाडी

30 December 2018 at 14:20

मेलबर्न:  भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १३७ धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे. कोहली ब्रिगेडने या विजयासह चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने तब्बल ३७ वर्षांनंतर कसोटी सामना जिंकला आहे. तर या विजयामुळे भारतीय संघाला आता ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

भारताने दुसऱ्या डावात दिलेल्या ३९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २६१ धावांमध्ये आटोपला. भारतीय गोलंदाजांनी या कसोटीत अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा आणि शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेऊन भारताला विजय प्राप्त करून दिला. 

सामन्याच्या चौथ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचे ८ फलंदाज तंबूत परतले होते. पण पॅट कमिन्सने भारताच्या विजयाचे स्वप्न काही पूर्ण होऊ दिले नव्हते. त्याने चौथ्या दिवसाअखेरपर्यंत खिंड लढवून भारताचा विजय लांबवला होता. चौथ्या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलिया ८ बाद २५८ धावा अशी धावसंख्या होती. पाचव्या दिवशी भारतीय संघ विजय साजरा करण्याच्या तयारीत असताना दिवसाची सुरूवातच पावसाने झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशिरा सुरू झाला. त्यामुळे भारतीय संघाचं विजयाचं स्वप्न अधूरं राहतं की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. पावसाने विश्रांती घेतली आणि चहापानानंतर सामना पुन्हा सुरू झाला. सामना खेळवण्यासाठी पंचांनी हिरवा कंदील दाखवल्याने भारताच्या आशा पल्लवित झाल्या. त्यात जसप्रीत बुमराहने याने संधीचं सोनं करत दुसऱ्याच षटकात भारताला नववी विकेट मिळवून दिली. बुमराहने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या पॅट कमिन्सला (११४) माघारी धाडलं. त्यानंतरच्या षटकात इशांत शर्माने नॅथन लायनला यष्टीमागे झेलबाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.