06:55pm | Jun 01, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यांपैकी एक असणार्या संपूर्ण जावली तालुक्यात दारुबंदी आहे. गेली पंधरा वर्षे जावली तालुक्यात दारुबंदी असतानाही सर्रासपणे अवैध दारुविक्री खुलेआम केली जात आहे. सातारा, वाई, महाबळेश्वर, पाचगणी आदी ठिकाणच्या परवानाधारक दारु दुकानांमधून जावली तालुक्यामध्ये अवैध दारुचा पुरवठा केला जात असल्यामुळे मेढा पोलिसांवर या अवैध दारुविक्रीवर कारवाई करताना अतिरिक्त ताण पडत आहे. मात्र अवैध दारुविक्रीवर चाप लावणारे राज्य उत्पादन शुल्क, सातारा येथील अधिकारी मात्र हफ्तेखोरीत दंग असल्यामुळे जावली तालुक्यात अवैध दारुविक्रीचा तिढा मेढा पोलिसांच्याच पायाला बसल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गाडा हाकत असताना अवैध दारुचा वेताळ मेढा पोलिसांच्या बोकांडी बसल्यामुळे मेढा पोलिसांची मात्र दमछाक होत आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सातारा जिल्ह्यामध्ये भले मोठे कार्यालय अस्तित्वात आहे. उत्पादन शुल्क अधिक्षक या पदावर राजपत्रित दर्जाचा अधिकारी बसलेला असतो. त्याच्या हाताखाली नऊ निरीक्षक सातारा जिल्ह्यातील उत्पादन शुल्कचे काम पाहतात. सातार्यासाठी एक निरीक्षक, तर दोन दुय्यम निरीक्षक आहेत. यामध्ये सातारा निरीक्षकांच्या कार्यक्षेत्रामध्ये सातारा, जावली, महाबळेश्वर, वाई हे चार तालुके येत असतात, तर कराड निरीक्षकांच्या कार्यक्षेत्रामध्ये कराड, पाटण तसेच औंध पोलीस स्टेशनचे परिक्षेत्र येते. फलटण निरीक्षकांच्या कार्यक्षेत्रात फलटण, खंडाळा, माण, कोरेगाव व वडूज आणि पुसेगाव परिक्षेत्र येते. मात्र, एवढे अधिकारी असूनसुद्धा जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर नकली तसेच अवैध दारुचा महापूर आलेला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये दखल घेण्यासारखी एकही चांगली कामगिरी जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा उत्पादन शुल्क विभाग हफ्तेखोरीमध्ये आकंठ बुडाल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी राज्य शासनाचे दारुबंदी खाते अस्तित्वात होते. त्याचे नाव बदलून महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क हे गोंडस नाव देण्यात आले. मात्र, टार्गेट वाढविण्याच्या नादामध्ये या खात्याकडून दारुवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा दारुविक्री कशी वाढेल, व त्याचा शासनाला जास्तीत जास्त महसूल कसा मिळेल, याकडेच राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्यांचा ओढा जास्त आहे.
महाराष्ट्र शासनाने 2016 साली महाराष्ट्र दारुबंदी कायदा 2008 मध्ये संशोधन करुन त्यामध्ये बदल केलेला आहे. नियमानुसार दारुचे दुकान हे गावठाणापासून 100 मीटर अंतरावर असायला हवे. तसेच दारु पिण्याच्या परवाना असल्यास पूर्वी महिन्याला 12 दारुच्या बाटल्या खरेदी करता येत होत्या. परंतू नव्या नियमानुसार महिन्याला फक्त दोनच बाटल्या खरेदी करता येणार आहेत. मात्र असा नियम असतानाही उत्पादन शुल्कच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील परवानाधारक वाईन शॉपवर ग्राहकांना विना परवाना सर्रासपणे दारु विक्री केली जात आहे. मुंबई दारुबंदी अधिनियमानुसार विनापरवानाधारक ग्राहकाला दारु विक्री करता येणार नाही, तसेच दारु विक्री करताना संबंधित ग्राहकाचे नाव, परवाना क्रमांक इत्यादींची रजिस्टरमध्ये नोंद करावी, असा नियम आहे. मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या हफ्तेखोरीमुळे परवानाधारक दुकानदाराकडून हे सर्व नियम फाट्यावर मारले जात आहेत. फलटण, महाबळेश्वर, वाई, कराड, पाटण, माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा, सातारा तालुका व शहरांमध्ये सुमारे शंभरपेक्षा जास्त देशी-विदेशी दारु विक्रीची दुकाने आहेत. हे सर्व नियम पायदळी तुडवून दारु विक्रेत्यांकडून दारुविक्री मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. मात्र या दुकानांमधून केवळ हफ्ता मिळत असल्यामुळे जिल्हा उत्पादन शुल्क जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे.
जावली तालुक्यात सुमारे 15 वर्षापूर्वी व्यसनमुक्त संघाचे विलासबाबा जवळ व रणरागिनींच्या दणक्यामुळे उभी बाटली आडवी झाली होती. त्यानंतर आजतागायत ती बाटली उभी झालेली नाही. मात्र असे असतानाही जिल्ह्यातील सर्वात जास्त दारुविक्री जावली तालुक्यातच होत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था सांभाळणार्या पोलिसांवर मात्र अनावश्यक अतिरिक्त ताण निर्माण झालेला आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळायची, का अवैध दारुविक्री करणार्यांच्या पाठिमागे लागायचे, या पेचामध्ये मेढा पोलीस अडकलेले आहेत. सुमारे एक वर्षापूर्वी मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि जीवन माने यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी अवैध दारुविक्री विरोधात धडक मोहीम सुरु केली. आतापर्यंतच्या कालखंडामध्ये त्यांनी लाखो रुपयांचा अवैध दारुचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच अवैध दारुविक्री करणार्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर काही दारु विक्रेत्यांना तडीपारी करण्याबाबतचा प्रस्तावही उपविभागीय अधिकार्यांकडे पाठविला आहे. एवढे मोठे रामायण होवूनसुद्धा सातार्यातील राज्य उत्पादन शुल्क मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. येथे कार्यरत असणार्या महिला उत्पादन शुल्क अधीक्षक फक्त नाममात्र आहेत. त्यांना त्यांचा वाटा मिळत असल्यामुळे जावली तालुक्यातील अवैध दारुविक्रीशी काहीही घेणेदेणे नाही.
नियमानुसार मोठ्या प्रमाणावर बॉक्समधून परवानाधारक दारु दुकानातून दारुविक्री करता येत नाही, मात्र महाबळेश्वर, वाई, सातारा, पाचगणी येथील दारुविक्री दुकानातून जावली तालुक्यातील अवैध दारु विक्रेत्यांना बॉक्सच्या बॉक्स दारुविक्री केली जात असल्यामुळे आज जावली तालुक्यामध्ये आडव्या बाटलीतूनही अवैध दारुचा महापूर आलेला आहे. याकडे ना उत्पादन शुल्क अधिक्षकांचे लक्ष आहे, ना जिल्हाधिकार्यांचे.
विनाकारण या सर्व प्रकारामुळे मेढा पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढलेला आहे. जावलीसारख्या अतिदुर्गम भागामध्ये कमी मनुष्यबळात कायदा व सुव्यवस्था सांभाळत असताना मेढा पोलिसांची मोठ्या प्रमाणावर दमछाक होत आहे. या सर्व प्रकरणामध्ये जिल्हा दंडाधिकारी या नात्याने सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी जावली तालुक्यातील महिलांकडून होवू लागली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |