RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

भारताची विजयी सलामी ; द. आफ्रिकेचा सलग तिसरा पराभव

06 June 2019 at 05:00

सलामीवीर रोहित शर्माचं धडाकेबाज शतक

साउथँप्टन : मुंबईकर रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने, २०१९ विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं २२८ धावांचं आव्हान भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्माने नाबाद १२२ धावा केल्या. त्याच्या या खेळीत १३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याला महेंद्रसिंह धोनीने चांगली साथ दिली. आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने २ तर ख्रिस मॉरिस आणि फेलुक्वायोने १ बळी घेतला. मात्र रोहित शर्माला माघारी धाडण्यात त्यांना अपयश आलं. दक्षिण आफ्रिकेची या स्पर्धेतली ही पराभवाची हॅटट्रीक ठरली आहे.

२२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन स्वस्तात माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची छोटेखानी भागीदारी झाली. विराट कोहली फेलुक्वायोच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि रोहितने पुन्हा एकदा भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.

लोकेश राहुल रबाडाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर रोहित शर्माने महेंद्रसिंह धोनीच्या साथीने आपलं शतक साजरं करत भारताला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना धोनी झेलबाद झाला. यानंतर रोहित शर्माने हार्दिक पांड्याच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. नाबाद शतकी खेळीसाठी रोहित शर्माला सामनावीर किताब देऊन गौरवण्यात आलं.

त्याआधी, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर, पहिला विश्वचषक सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला २२७ धावांवर रोखलं आहे. सलामीच्या फळीतील फलंदाजांचं अपयश हे आफ्रिकन संघाच्या खराब कामगिरीचं कारण ठरलं. आफ्रिकेकडून मधल्या फळीत ख्रिस मॉरिसने आश्वासक फलंदाजी केली.

नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. जसप्रीत बुमराहने हाशिम आमला आणि क्विंटन डी-कॉक यांना माघारी धाडत आफ्रिकेला बॅकफूटला ढकललं. यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि वॅन डर डसन यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र चहलने डसन आणि डु प्लेसिस यांना ठराविक अंतराने माघारी धाडत भारताचं पारडं पुन्हा एकदा जड केलं.

मधल्या फळीत भरवशाच्या जे.पी.ड्युमिनीलाही फारशी चमक दाखवता आली नाही. तो कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. यानंतर फेलुक्वायो आणि ख्रिस मॉरिस यांनी सातव्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी करत संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. भारताकडून युजवेंद्र चहलने ४ बळी घेतले. त्याला जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २-२ तर कुलदीप यादवने १ बळी घेत चांगली साथ दिली.