11:13pm | Mar 19, 2018 |
सातारा :जिल्ह्यातील सर्वात गब्बर समजली जाणार्या पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेच्या 'खाबुगिरीमुळे' राज्याच्या राज्यपालांना थेट हस्तक्षेप करावा लागण्याची धक्कादायक घटना नुकतीच उजेडात आली असून, मुख्यमंत्री कार्यालयालाही पाचगणी पालिकेच्या 'सुपारी'कांडामुळे' मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाचगणी नगरपालिकेच्या नाड्या आवळण्याचे काम सुरु असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचगणी हे हिलस्टेशन आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. पाचगणीतील टेबल लॅण्ड हे अशिया खंडातील सर्वात जास्त उंचीवरील एकमेव मोठे पठार आहे. देशभरातून या हिलस्टेशनला भेट देण्यासाठी लाखो लोक याठिकाणी येत असतात. त्यामुळे विविध माध्यमातून पाचगणी पालिकेला कोट्यवधी रुपये करस्वरुपातून निधी येत असतो. वास्तविक एवढा निधी येत असताना विकासकामांच्या बाबतीत मात्र पाचगणी पालिकेची पाटी अद्याप कोरीच आहे. विविध उपक्रम राबवून त्याद्वारे स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात नगराध्यक्षांसह पालिका मुख्याधिकारी व्यस्त असतात. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरु असलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण म्हणजे पाचगणी पालिकेचा निव्वळ फार्स असून याचा एक उत्तम नमुना पाचगणी येथील एमआरए सेंटरच्या माध्यमातून उघडकीस आला आहे.
पाचगणीतील एमआरए सेंटर म्हणजे पाचगणीची खरी ओळख. याठिकाणी देशभरातील राजपत्रित अधिकारी, मंत्री प्रशिक्षणासाठी येत असतात. या सेंटरमध्ये जगभरातील अनेक लोक याठिकाणी संशोधनासाठी येत असतात. युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी याठिकाणी वेगवेगळी शिबिरे वर्षातून अनेकवेळा घेतली जातात. थेट याठिकाणी राज्यपालांचा अधिकार चालतो. त्यांच्या अधिकारात एमआरए सेंटर येते. असे असताना सुमारे दोन महिन्यांपूर्वी पाचगणी पालिकेकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छ सर्व्हेक्षणाद्वारे संपूर्ण पाचगणी स्वच्छ करण्याचे काम सुरु होते. असे असताना नियमात बसत नसतानाही पाचगणी पालिकेने येथील एका व्यक्तीचा खाजगी रस्ता करण्यासाठीची ‘सुपारी’ घेतली होती. मात्र, याचा सर्व खर्च स्वच्छ सर्व्हेक्षणमधूनच काढला जात होता. हे काम सुरु असताना याठिकाणी जेसीबीने रस्त्याचे काम सुरु होते. दरम्यान, ही गोष्ट एका सामाजिक कार्यकर्त्याने महाबळेश्वर तहसिलदार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार हे अवैध काम तहसिलदारांनी बंद पाडून संबंधित जेसीबी ताब्यात घेतला होता.
ही घटना घडल्यानंतर काही वेळातच एमआरए सेंटरची जलवाहिनी तुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले होते. ही घटना एमआरए सेंटरच्या कर्मचार्यांनी महाराष्ट्र जिवन प्राधिकरण अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मजिप्रचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता पाचगणी नगरपालिकेच्या खाजगी रस्ता बनवून देत असताना ही जलवाहिनी तुटल्याचे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ही बाब पाचगणी पालिकेच्या अखत्यारित आहे, त्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीही पालिकेनेच करुन द्यावी, अशी भूमिका घेवून हात वर केल्यामुळे एमआरए सेंटरचे कर्मचारी भांबावून गेले. एमआरए सेंटरमध्ये शेकडो प्रशिक्षणार्थी वास्तव्यास आहेत. पाणी बंद असल्यामुळे या प्रशिक्षणार्थींची मोठी गैरसोय झालेली आहे, असा संदेश पाचगणी पालिकेला एमआरए सेंटरकडून पाठविण्यात आला. परंतू खाबुगिरीत आणि स्वत:च्या मस्तीत मश्गुल असणार्या पाचगणी पालिका पदाधिकार्यांना या गोष्टीची दखल घेण्यात कोणतेही स्वारस्य वाटले नाही. सुमारे दोन महिने पाचगणी पालिका आणि मजिप्राच्या कलगीतुर्यात एमआरए सेंटरचा पाणीपुरवठा बंद होता. यावेळी एमआरए सेंटरकडून पालिका आणि मजिप्राकडे लेखी पत्रव्यवहारसुद्धा करण्यात आले. परंतू दोन्हीकडूनही त्यांना वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या.
नाईलाजाने याबाबत एमआरए सेंटरला राज्यपालांकडे तक्रार करावी लागली. या घटनेची राज्यपाल कार्यालयाने गंभीर दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयातील नगर विकास विभागाला याबाबत ‘कारणे दाखवा’ नोटीसही पाठविल्याचे समजते. पाचगणी पालिकेच्या बेबंदशाहीमुळे आज थेट राज्यपालांना या क्षुल्लक गोष्टीमध्ये लक्ष घालावे लागले, ही मोठी दुर्दैवाची बाब आहे, असे पाचगणी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने ‘सातारा टुडे’शी बोलताना सांगितले. खाजगी रस्ता बनवून देणे हे पाचगणी पालिकेच्या अखत्यारीतील काम नसतानाही तो खाजगी रस्ता स्वच्छ सर्व्हेक्षणमधून त्या व्यक्तीस आर्थिक तडजोडीतून करुन दिला जात होता, अशी दबकी चर्चा पाचगणीमध्ये ऐकावयास मिळत होती. सुपारीबाज पाचगणी पालिकेचे असे अनेक प्रताप यापूर्वी उघडकीस आले आहेत. पाणीपुरवठा बंद असताना एमआरए सेंटरला खाजगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागल्यामुळे एमआरए सेंटरचे पाचगणी पालिकेच्या प्रतापामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
राज्यपाल कार्यालयातून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय व पाचगणी पालिकेचे यासंदर्भात कान टोचल्यानंतर चिडून जावून पाचगणी पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे पाणी बिल भरणा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकल्यामुळे पाण्याचे बिल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना तारेचे कुंपण ओलांडून कार्यालयात जावे लागले. या सर्कशीमध्ये अनेक लोक काटेरी कुंपण लागल्यामुळे जखमी झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी यावेळी अनेक लोकांनी पाचगणी पालिकेला शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या. या सर्व प्रकारामुळे पालिकेची शहरातच छी, थू झाली आहे. सुपार्या घेवून काम करणार्या पाचगणी पालिकेच्या या ‘उद्योगा’मुळे मुख्यमंत्री कार्यालयासह सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला नसता मनस्ताप सहन करावा लागल्यामुळे पाचगणी पालिकेच्या नाड्या थेट मुख्यमंत्री कार्यालयातूनच आवळल्या जाणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे पाचगणी पालिकेतील पदाधिकार्यांना किती उठबशा काढाव्या लागतील, हे मात्र येणार्या काळातच समजणार आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |