सातारा : 'केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली...कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली...' पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताने माणसांच्या आयुष्यावर प्रभाव पडला. जशी माणसांची देहबोली असते तशीच संगीतकाराची स्वरबोली असते आणि त्या स्वरांमधूनच संगीतकार आपल्या भावना व्यक्त करतो, असे मत हिंदी मराठी चित्रपट संगीत अभ्यासक विशेषसज्ञ आणि लेखिका डॉ. मृदुला दाढे यांनी व्यक्त केले.
नामवंत संगीतकार श्रीनिवास खळे, सुधीर फडके, पंडित हृदयनाथ मंगेशकर, अशोक पत्की यांच्या गाण्यांमागच्या सुरेल गोष्टी महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा पुणे व सातारा नगरपरिषद सातारा आयोजित मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त तरी असेल गीत हे या सहप्रयोग व्याख्यानात डॉ. मृदुला दाढे यांनी उलघडल्या. या कार्यक्रमाला सातारकर रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. दत्तात्रय बनकर, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, किशोर बेडकीहाळ, ॲड. चंद्रकांत बेबले, डॉ. राजेंद्र माने, वजीर नदाफ, सचिन सावंत, संजय माने, अजित साळुंखे व जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापक अनिल जठार उपस्थित होते.
डॉ. मृदुला दाढे पुढे म्हणाल्या, मसाप शाहूपुरी शाखेने मला या कार्यक्रमाला बोलावले त्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे. सातारा शहराशी माझे खूप ऋणानुबंध आहेत. माझे मुळगाव लिंब गोवे आहे. एवढे सगळे असूनही माझा प्रथमच कार्यक्रम साताऱ्यात होत आहे. संगीत क्षेत्रात मी पीएचडी केली असली तरी संगीताचे भावविश्व खूप खोलवर आहे. आपण गाणी नेहमीच ऐकत असतो परंतु प्रत्येक गाण्याला आपल्याला काहीतरी सांगायचे असते ते आपण अर्थपूर्ण समजून घेतले पाहिजे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत विश्वात खूप मोठे योगदान आहे. अशा अनेक कविता त्यांनी संगीतबद्ध केल्या नसत्या तर त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नसत्या शास्त्रीय संगीतात जसे घराणे असते तसेच भाव संगीतातही घराणे आहेत. त्यातीलच एक घराणे म्हणजे मंगेशकर घराणे काव्यरचनेत संगीताचे किती महत्व असते हे हृदयनाथ मंगेशकर यांनी दाखवून दिले आहे. डॉ.दाढे यांनी शांताबाई शेळके यांचे 'हे वाट दूर जाते स्वप्नां मधील गावा', 'मोगरा फुलला' अशा अनेक गाण्यांचे भावविश्व उलगडून सांगितले.
उपनगराध्यक्ष ॲड दत्तात्रय बनकर म्हणाले की, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन्ही राजेंच्या माध्यमातून सातारा शहराचा कायापालट होत आहे. साताऱ्यात कला,सांस्कृतिक रुजावी यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. मराठी भाषेला अभिजीत भाषा करण्यासाठी आम्ही आंदोलने केली. मसाप शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून मराठी भाषेसाठी चांगले काम होत असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी डॉ. मृदुला दाढे यांच्या कार्याची ओळख करून दिली. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र माने यांनी केले सूत्रसंचालन सविता कारंजकर तर ॲड. चंद्रकांत बेबले यांनी आभार मानले.