'मोकाट' बुलेटस्वारांना फलटण पोलिसांचा दणका; १० दिवसांत २०७ केसेस, दीड लाखांहून अधिक दंड वसूल

by Team Satara Today | published on : 11 March 2026


​फलटण  : फलटण शहरात विनाकारण फिरणारे ट्रिपल सीट दुचाकीस्वार, विना नंबर प्लेटच्या गाड्या आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 'मॉडिफाय सायलन्सर' लावलेल्या बुलेटस्वारांवर फलटण शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवघ्या १० दिवसांच्या विशेष मोहिमेत पोलिसांनी तब्बल २०७ केसेस दाखल करत दीड लाखांहून अधिक रुपयांचा दंड ठोठावला आहे. ​पोलिसांच्या या 'सिट्टी'मुळे फलटणमधील हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांचे धाबे दणाणले असून, नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

​दि. १ मार्च ते १० मार्च २०२६ या कालावधीत फलटण शहर पोलीस ठाण्याच्यावतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने ​ट्रिपल सीट दुचाकी: नियमांचे उल्लंघन करून फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई. ​विना नंबर प्लेट: नंबर प्लेट नसलेल्या संशयास्पद वाहनांची धरपकड. ​बुलेट सायलन्सर: सायलेन्सरमध्ये बदल करून शहरात मोठमोठ्याने आवाज करत फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर पोलिसांनी विशेष नजर ठेवली होती.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेदरम्यान: ​एकूण केसेस: २०७, ​एकूण दंड: १,४९,१०० रुपये (एक लाख ४९ हजार १०० रुपये), ​रोख वसूल दंड: १५,२०० रुपये, ​जप्त सायलन्सर: कारवाई दरम्यान १४ मॉडिफाय सायलन्सर जप्त करण्यात आले आहेत.

​ही धडक कारवाई सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक  डॉ. वैशाली कडुकर, आणि फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी . विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, वाहतूक विभागाचे सहा. पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस कर्मचारी ऋषिकेश खरात, पांडुरंग धायगुडे, सुरज परिहार आणि संभाजी जगताप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बॉम्बे रेस्टॉरंट येथे जुगाराच्या अड्ड्यावर छापा; एका युवकावर गुन्हा
पुढील बातमी
सरपंच व सदस्यांचा कार्यकाल संपलेल्या 763 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती

संबंधित बातम्या