बांधकाम मजुराचा मुलगा सैन्यदलात लेफ्टनंट

by Team Satara Today | published on : 29 May 2025


बीड : ‘जीवनामध्ये होईल तर सैन्य दलातील अधिकारी आणि देशसेवा करीन’, असे स्वप्न उराशी बाळगत फुलसांगवी (ता. शिरूर कासार) येथील आकाश रामदास गोर्डे या २४ वर्षीय तरुणाने सैन्य दलातील लेफ्टनंटपदी मजल मारली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या या युवकाने मोठ्या जिद्दीने हे यश प्राप्त करत नावलौकिक केला आहे. सैन्य दलातील प्रथम श्रेणीतील अधिकारी असणारे हे पद असून अखिल भारतीय पातळीवर ५१० जणांच्या यादीमध्ये आकाशाने ४७ वा क्रमांक प्राप्त केला.

फुलसांगवी येथील रामदास गोर्डे हे बांधकाम क्षेत्रात मजूर म्हणून काम करतात तर त्यांच्या पत्नी गृहिणी. एक एकर शेती असल्यामुळे रामदास यांनी मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. रामदास यांचा मुलगा आकाशने मात्र लहानपणापासूनच आपल्या वडीलांचे कष्ट पाहिल्याने अभ्यासावर भर दिला. त्याला सैन्य दलाची प्रचंड आवड होती. २६ जानेवारीचा परेड पाहून आपणही असंच परेडमध्ये असावे, असं त्याला नेहमी वाटायचे. इयत्ता आठवी नववीला शिकत असताना त्याने त्याच हेतूने एनसीसीमध्ये प्रवेश घेतला. 

दहावीला त्याला ८८ टक्के तर बारावी विज्ञान शाखेत त्याला ५३ टक्के गुण मिळाले. पदवी परीक्षेमध्ये आकाशला ८३ टक्के गुण मिळाले. पदवीला प्रथम, द्वितीय तसेच तृतीय वर्षामध्ये त्याने एनसीसीमध्ये सहभाग घेऊन ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ हे एनसीसीचे प्रमाणपत्र मिळवले. २०२० मधील प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडमध्ये सहभागी होण्याची त्याला संधी मिळाली. पदवी झाल्यानंतर त्याने ‘कम्बाईन डिफेन्स सर्विसेस’साठी तयारी सुरू केली. मागील चार वर्षापासून तो यासाठी प्रयत्न करत होता. यावर्षी पाचव्या प्रयत्नात त्याची लेफ्टनंटपदी निवड झाली.

मी आठवी-नववीपासून सैन्यात जाण्याचा विचार करत होतो. त्यामुळे मी एनसीसीमध्ये प्रवेश घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही भाग घेतला. पदवी झाल्यानंतर पाच वर्षे सलग तयारी करून यश मिळवले. व्यायाम, शिस्त, एकाग्रता यांच्या बळावर मला हे यश मिळाले आहे. माझ्या आई-वडिलांनी कायम पाठबळ दिले.

- आकाश गोर्डे, फुलसांगवी.

आकाशाला सैन्य दलाची आवड होती त्यानुसार त्याने तयारी केली. मुलांवर आपली इच्छा न लादता त्याच्यात काय गुण आहे तो ओळखून त्याला प्रोत्साहन दिले. आकाश एवढ्या मोठ्या पदावर गेल्यामुळे आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

- रामदास गोर्डे, आकाशचे वडील.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एन.डी.आर.एफ.ची पथक कराड येथे दाखल
पुढील बातमी
लोकशाही दिनाचे 2 जून रोजी आयोजन

संबंधित बातम्या