सातारा : लोकसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असल्या तरी ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर याची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळते. महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते महायुतीत सामील होताना दिसत आहेत. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ऑफर मिळत असून, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या कुणबी दाखल्याबद्दल शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी दिली. तसेच आमच्याकडून ओबीसींवर कोणताही अन्याय झाला नसून समोरून कुणबी उमेदवार दिल्याने आम्ही कुणबी उमेदवार दिला, असे महेश शिंदे यांनी सांगितले. तसेच प्रिया शिंदे यांच्या माहेरकडील वंशावळीमध्ये कुणबी हा उल्लेख असल्याने हा दाखला वैध आहे. ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबत मीडिया ट्रायल करु नये, असे आवाहन महेश शिंदे यांनी केले.
शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत मीच करेन. मी त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे नेतृत्व मान्य करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला देखील दिला आहे. महायुतीत ते आले पाहिजेत. ते तिकडे कशाला थांबलेत. त्यांनी इथे आले पाहिजे. मी स्वतः पहिले त्यांचे स्वागत करेन, असे महेश शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसून आगामी काळामध्ये व्यवस्थित होईल, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, निवडणुका संपल्यात आता पक्ष वाढीचा हंगाम सुरू झाला. राज्यात शिवसेनेला बळकट करण्यासाठी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचा, जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करा आणि पक्षवाढीसाठी योगदान देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कामाचा अहवाल नसेल, जे काम करणार नाहीत, त्यांना थेट नारळ देणार असा सज्जड दम शिंदेंनी या बैठकीत दिला.