मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा करिष्मा; जावळी पंचायत समितीवर भाजपची सत्ता; सभापतीपदी सौरभ शिंदे, उपसभापतीपदी गोरख महाडीक

by Team Satara Today | published on : 16 March 2026


मेढा  : जावली पंचायत समितीच्या सभापतीपदी सौरभ शिंदे  तर उपसभापती पदी गोरख महाडीक यांची निवड झाल्याने पंचायत समितीवर भाजपचा झेंडा  फडकला. या घडामोडीत मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा करिष्मा दिसून आला. 

जावली तालुका पंचायत समितीच्या  होणाऱ्या सभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही भाजपा तीन,शिवसेना दोन, व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एक असे पक्षीय बलाबल या सभागृहात आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी व मित्र पक्षांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली होती. स्पष्ट बहुमत अभावी जावली पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड अत्यंत रंजक अवस्थेत मध्ये पोहोचली.                                                  

सभापती, उपसभापती निवडीसाठी  विशेष सभा सभागृहामध्ये  पिठासन अधिकारी राजश्री मोरे, यांचे अध्यक्षतेखाली सभेचे सदस्य व सभागृहाचे सचिव तथा गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, तहसिलदार प्रविण मुगदुल, सपोनि सुधीर पाटील यांच्या उपस्थतीतीमध्ये झाली.

 सकाळी ११ नंतर दोन्ही पदसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. सभापती पदासाठी भाजपकडून सौरभ शिंदे तर सेना व मित्र पक्षाच्या कडून कुसुंबी गटाच्या पं.स. सदस्या सुनिता दुंदळे यांचा अर्ज दाखल झाला होता. तर उपसभापती पदासाठी भाजपकडून गोरख महाडीक तर सेनेकडून सुनिता दुंदळे असे अर्ज दाखल झाल होते. सुनिता दुंदळे यांनी उपसभापती पदाचा अर्ज माघारी घेतल्याने भाजपचे गोरख महाडीक बिनविरोध निवडून आले.         सभापती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सौरभ शिंदे यांना तीन मते मिळाली. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सदस्या शिल्पा शिंदे यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने  सुनिता दुंदळे यांना दोन मते मिळाली.  या प्रक्रियेमध्ये  भाजपचे सौरभ शिंदे हे बहुमताने विजयी झाले.         

यापूर्वी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळी सौरभ शिंदे यांनी उपसभापती पदाची धुरा यशस्वी सांभाळली होती. गोरख महाडीक पहिल्यांदाच निवडून आले आणि  उपसभापती झाले.  सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्र सिंहराजे भोसले सकाळपासूनच पंचायत समिती च्या कार्यालयात बसून होते. तर जावलीचे नेते वसंतराव मानकुमरे नाट्यमय घडामोडी च्या प्रयत्नात होते. भाजपचे अनेक पदाधिकारी तसेच सेनेचे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही तडजोडी शेवटपर्यंत चालू होत्या. मात्र काही नेत्यांनी चिठ्ठीवरच सभापतीची निवडणूक झाली पाहीजे अशी भूमिका घेतल्या अखेर मतदानावर प्रक्रिया पार पडली. आमदार शशिकांत शिंदे सर्व घडामोडीकडे लक्ष ठेवून होते. तर सेनेचे अंकुश कदम कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून सुचना करत होते.    

       

 जावली पंचायतीच्या स्थापनेपासून काँग्रेस, एसू, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी सत्ता उपभोगली होती. मात्र पहिल्यांदाच पंचायत समितीवर  भाजपचा झेंडा फडकला आहे. निवनिर्वाचित सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, यांचे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी  जि.प. सदस्य वसंतराव मानकुमरे, जि.प. सदस्या जयश्रीताई गीरी, अमित कदम यांच्यासाह अनेक पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार
पुढील बातमी
माण पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा 'झेंडा'; मंत्री जयकुमार गोरेंना घरच्या मैदानात मोठा धक्का; राष्ट्रवादीचे विक्रम शिंगाडे सभापतीपदी तर प्रियांका जगदाळे यांची उपसभापतीपदी निवड

संबंधित बातम्या