संविधानाच्या स्वप्नातला भारत; पूनम संभाजी माने यांचा राष्ट्रीय निबंध स्पर्धेत खुल्या गटात तृतीय क्रमांक विजेता निबंध

पूनम संभाजी माने, मु.पो कुरोली सिध्देश्वर, ता.खटाव जि.सातारा

by Team Satara Today | published on : 12 March 2026


कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ ,सातारा भाषामंडळ व मराठी विभाग आयोजित भारतीय लोकशाही महोत्सव व वंदे मातरम गीत उत्सव निमित्त आयोजित राष्ट्रीय निबंध स्पर्धेत खुल्या गटात तृतीय क्रमांक विजेता निबंध

------------------------------------------------------------------------------------------------------------

विविधतेत एकता असणाऱ्या भारताचा सध्याच्या परिस्थितीशी तसेच स्वतंत्रपूर्व काळ अशा दोन्ही परिस्थितीत विचार करावयाचे म्हटले तर भारताची पुनर्बांधणी,प्रशासन तसेच विकासाच्या पथावर मार्गक्रमण स्वातंत्र्यानंतर शक्य झाले असेल ते फक्त आणि फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  अथक प्रयत्नातून निर्माण झालेल्या संविधानामुळे! प्रत्येक व्यक्ती व समाजाला जगण्याचा अधिकार तसेच त्यास प्राप्त मूलभूत कर्तव्यांच्या जाणीवीमुळेच आज एक संघ राष्ट्र म्हणून 'भारत' जगात मानाने मिरवत आहे. स्वातंत्र्यपूर्व  काळ हा विविध इस्लामी आक्रमणे, शाह्यांच्या प्रभावाने तसेच ब्रिटिश राजवटीमुळे भारत हा सर्वच दृष्टीने पोखरला गेला होता. त्याला नवसंजीवनी देण्याचे मोलाचे कार्य 'भारतीय संविधानाने' केल्याने जगाच्या दृष्टीने भारतीय लोकशाही सर्वांना आदर्शवत अशी ठरली आहे.

"धर्म-जात न पाहता  माणूसपण जपणारा,

हक्क-कर्तव्यांचा समतोल राखणारा,

लोकशाही मूल्यांवर उभा भारत महान,

संविधानाच्या स्वप्नात दिसतो समान सन्मान.

भारताचे संविधान हे जगातील सर्वात विस्तृत आणि सखोल लिखित संविधान मानले जाते. ते केवळ कायद्याचे संकलन नसून स्वातंत्र्यानंतर भारताने कोणत्या मूल्यांवर उभे राहावे,समाज कसा असावा आणि नागरिकांचे जीवन कसे घडावे यांचे स्वप्न मांडणारा 'दस्तऐवज' आहे. संविधानाच्या स्वप्नातला  भारत म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार मूलभूत स्तंभांवर उभा असलेला लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारा आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणारा हाच तो आपला 'भारत' होय. देशातील प्रत्येक नागरिकास पडलेले एक सशक्त,समाजवादी आणि लोकशाहीचे गोड स्वप्न आहे, जिथे सर्वांसाठी समान संधी खुल्या आहेत. आणि जिथे न्याय हा समाजाचा कणा आहे.

थोडक्यात असे म्हणावे लागेल की भारताने स्वातंत्र्यपूर्व काळात गुलामगिरी, अन्याय, शोषण आणि असमानता अनुभवली. ब्रिटिश राजवटीत भारतीयांना स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते. समाजात जातीभेद,अस्पृश्यता, स्त्री-पुरुष असमानता, आर्थिक विषमता यांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव होता. या पार्श्वभूमीवर संविधान निर्मात्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे तर सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य देणाऱ्या भारताचे स्वप्न पाहिले हेच स्वप्न संविधानात शब्दबद्ध झाले.

"आम्ही भारताचे लोक, अशी गर्जना,

लोकशाहीच्या वाटेवर अढळ अशी  भावना,

हक्कांसोबत कर्तव्यांची जाण ठेवूया,

संविधानाचा आदर मनात जपूया."

संविधानाची प्रस्तावना ही संविधानाच्या आत्म्याचे प्रतीक आहे 'आम्ही भारताचे लोक' या शब्दापासून सुरुवात होणारी प्रस्तावना भारतात लोकसत्ताक, लोकशाहीची पायाभरणी करते. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक भारत ही संकल्पना संविधानाच्या स्वप्नातील भारताचे स्वरूप स्पष्ट करते. सार्वभौम म्हणजे भारत कोणत्याही सत्तेच्या अधीन नाही. समाजवादी म्हणजे समाजातील संपत्तीचे न्याय्य वाटप व्हावे, धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्मांना समान सन्मान, सर्वांना आपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना, सण-समारंभ इ.साजरे करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य. लोकशाही प्रजासत्ताक म्हणजे सत्ता जनतेच्या हाती असणे, यालाच प्रजातंत्र असेही म्हटले जाते. लोकशाहीत प्रजा आपले नेतृत्व गुप्त मतदान पद्धतीने निश्चित करते. त्यामुळे योग्य असे नेतृत्व प्राप्त होऊन लोकशाही दृढ होण्यास मदतच होते.


"हक्क दिले जबाबदारीही शिकवली,

लोकशाहीची त्याने मान उंचवली,

असे संविधान पाया विकासाचा,

नसे तोड तया अन्य कशाचा.

संविधानाचे स्वप्नातला  भारत न्यायाची पायाभरणी करणारा देश आहे. येथे प्रत्येक नागरिकास कायद्याचे रक्षण तथा संरक्षण प्राप्त असून सारेजण कायद्यापुढे एक समान आहेत. समानतेचा हक्क, जात, धर्म ,लिंग ,भाषा ,प्रांत अशा कोणत्याही आधारावर भेदभावास नकार देतो. भारताची रचनाच मुळात 'भाषिक' तत्त्वावर झाली आहे. विविध घटक राज्यांची वेगवेगळी भाषा,वेशभूषा, खान-पान, सन- समारंभ,संस्कृती जरी वेगवेगळी असली तरी भारतात विविधतेत एकता निर्माण करण्याचे कार्य आपल्या संविधानानेच केले आहे. आणि विविधतेत 'एकता' हेच भारताचे वैभवशाली वैशिष्ट्य संपूर्ण जगास मार्गदर्शक असेच आहे. समाजातील दुर्बल घटकांना समान संधी मिळावी यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. भारतीय संविधानातील कायद्यातील तरतुदींना लवचिकता असल्याने त्या दुरुस्तीला ही वाव आहे. यामागील उद्देश कोणा एकाला विशेष अधिकार देणे नसून ऐतिहासिक अन्याय दूर करून सर्वांना समान पातळीवर आणणे हा आहे. संविधानाचा भारत हा अन्याय विरुद्ध उभा राहणारा 'राष्ट्रपुरुषच' होय.

स्वातंत्र्याचा हक्क हा संविधानाच्या स्वप्नातील भारताचा महत्त्वाचा भाग आहे. विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य,संघटन स्वातंत्र्य या अधिकाऱ्यांमुळे नागरिकांचे व्यक्तिमत्व विकसित होते. कोणत्याही लोकशाहीत विचार मांडण्याचे स्वातंत्र्य अत्यंत आवश्यक असते. संविधानाच्या भारतात टीका करणे म्हणजे देशद्रोह नसून लोकशाहीचा भाग मानला जातो. मात्र स्वातंत्र्य जबाबदारीने वापरणे अपेक्षित आहे .धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क भारताच्या विविधतेला बळकटी देतो. घटनात्मक उपायांचा हक्क नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करतो. या सर्व हक्कामुळे संविधानाच्या स्वप्नातील भारत हा मानवतावादी आणि न्यायप्रिय भारत ठरतो.

"न्याय, समता, स्वातंत्र्याची वाट,

बंधुतेने जोडली माणसांची जात,

संविधान दाखवते उज्वल भविष्याची दिशा,

हाच स्वप्नातील भारत मानी मानवतेची भाषा".

संविधानाने केवळ हक्कच दिले नाहीत तर कर्तव्यांची जाणीव करून दिली आहे.मूलभूत कर्तव्य नागरिकांना राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता ,पर्यावरण संरक्षण, सार्वजनिक मालमत्तेचे जतन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची शिकवण देतात. संविधानाच्या स्वप्नातील भारतात नागरिक फक्त हक्क मागणारे नसून कर्तव्य पार पाडणारे सजग नागरिक असतात. कर्तव्य पाळण्यासच हक्कांचे खरे मोल कळते. हे संविधान अधोरेखित करते. संविधानाने मूलभूत कर्तव्यांची संकल्पना नाही मांडली आहे.फक्त हक्क मागणे पुरेसे नाही तर देशासाठीची  कर्तव्य पार पाडणे ही देखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. संविधानाने प्राप्त करून दिलेले धर्म पाळण्याचे,प्रचार करण्याचे आणि आचरण करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास असले तरी याचे योग्य प्रकारे वापर करणे हेच प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. भारत हा सहिष्णुता, सहअस्तित्व आणि परस्पर सन्मानावर व समन्वयावर   उभा असलेल्या अभेद्द्य असा 'स्तंभ' होय. म्हणूनच संविधानाचा आदर करणे. राष्ट्रीय एकात्मता जपणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे पर्यावरण रक्षण व संवर्धन करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बानवणे ही प्रत्येक नागरिकाची खरी जबाबदारी आहे. संविधानाच्या स्वप्नातील भारतात नागरिक सुजग,जबाबदार आणि राष्ट्रहिताची जाणीव असलेले आहेत.

राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमधून संविधानाने कल्याणकारी राज्याचे स्वप्न पाहिले आहे. सर्वांना शिक्षण,आरोग्य,रोजगार,सामाजिक सुरक्षा मिळावी, ग्रामीण- शहरी भागाचा समतोल विकास व्हावा अशी दिशा या तत्त्वांमधून दिली आहे. जरी ही तत्वे न्यायालयात अंमलात आणता येत नसली तरी ती शासनाच्या धोरणांना नैतिक दिशा देतात. संविधानाच्या स्वप्नातील भारत हा केवळ कायद्याने नव्हे तर करुणा आणि न्यायाने चालणारा 'राजदंड' होय. संविधानाने स्त्री-पुरुष समानतेवर विशेष भर दिला आहे. दीर्घकाळ स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जात होती. संविधानाने महिलांना समान अधिकार देऊन त्यांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा केला. आज नोकरी, राजकारण, क्रीडा,विज्ञान अशा सर्व क्षेत्रात महिलांची प्रगती दिसून येते. हे संविधानाच्या स्वप्नातील भारत साकार होत आहे. हे गौरवशाली भारताच्या इतिहासाचे 'सोनेरी पानच' होय.

"साकारले समतेने भविष्य भारताचे,

संविधान दीपस्तंभ घडवी भाग्य उदयाचे,

मूल्य संवर्धन कर्तव्य असे जणांचे,

स्वागत करूया स्वयंपूर्ण लोकशाहीचे."

संविधानाचा भारत हा लोकशाही मूल्यांवर आधारित आहे. नियमित निवडणुका, स्वतंत्र्य,न्याय पालिका,स्वायत्त माध्यमे आणि कायद्यांचे राज्य ही लोकशाहीची मूळरूप वैशिष्ट्ये होत. संविधानाने सत्तेचे विभाजन करून हुकूमशाहीला आळा घातला आहे. संसद,कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यातील संतुलन लोकशाही टिकवून ठेवते. संविधानाच्या स्वप्नातल्या  भारतात सत्ता सेवेसाठी असते. दडपशाहीसाठी नव्हे. यावरून असे लक्षात येते की जनतेचा सहभाग, मतभेदांची मोकळी अभिव्यक्ती आणि शांततेच्या मार्गाने सत्तांतर हे लोकशाहीची प्रमुख लक्षणे होत. यामुळे "जनतेचे, जनतेसाठी आणि जनतेद्वारे शासन" ही लोकशाहीची संकल्पना संविधानामुळेच साकार झाली. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार यामुळे प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क मिळाला. शिक्षण, संपत्ती किंवा सामाजिक स्थान न पाहता प्रत्येकाला समान मतमूल्य देण्यात आले. संविधानाच्या स्वप्नातील भारतात जनता हीच खऱ्या अर्थाने सत्ताधारी आहे 'सरकार' हे जनतेचे सच्चे सेवक असावे हीच या लोकशाहीची अपेक्षा आहे.

"कायद्यापुढे सगळे समान ठरले

दुर्बलांच्या अश्रू ही संविधानाने पुसले

स्वप्न हे नव्हे फक्त कागदावरील विचार

आचरणात आणूया संविधानाचा संस्कार."

खरे पाहता एवढ्यातच संविधानांचे स्वप्न पूर्णपणे साकार झाले असे म्हणता येणार नाही. आजही गरिबी,बेरोजगारी, भ्रष्टाचार, जातीयवाद, धार्मिक तणाव, पर्यावरणाचा ऱ्हास आणि शिक्षणातील असमानता तसेच स्त्रियांवरील होणारे अत्याचार यांसारखी गंभीर आव्हाने आपल्या भारतासमोर ठाण मांडून बसली  असल्याने काही वेळा संविधानातील मूल्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते,मात्र ही अपयशे संविधानाची नसून आपल्या आचरणाची,अंमल बजावणीतील आहेत.संविधानाने आपल्याला योग्य दिशा दिली आहे. त्या दिशेने आता प्रामाणिकपणे चालण्याची जबाबदारी खरे तर आपलीच आहे.


संविधानाच्या स्वप्नातला  भारत हा केवळ कल्पनाविलास नसून साध्य करता येण्यासारखा आदर्श आहे. हे स्वप्न केवळ पुस्तकात मर्यादित न राहता आपल्या कृतीत, विचारात आणि आचरणात उतरवणे हीच खरी संविधान निष्ठा आहे. आपण सर्वजण जर संविधानाच्या मूल्यानुसार वागून भारत नक्कीच संविधान  निर्मात्यांनी  पाहिलेल्या स्वप्नासारखा बनेल यात शंकाच नाही. म्हणूनच संविधान हे आपल्या हातातील मार्गदर्शक दीप आहे. प्रत्येक नागरिकाने ते समजून घेतले, जपले आणि  आचरणात आणले तरच भारत एक सशक्त, समाजवादी, लोकशाही आणि मानवतावादी राष्ट्र म्हणून साकार होईल, शेवटी एवढेच मांडावेसे वाटते -

"संविधानातील मूल्य जपूया,

लोकशाही मजबूत करूया,

विविधतेत एकता जाणूया,

कायद्याचे राज्य आणुया."

संविधानाचे स्वप्नातला  भारत जगाच्या इतिहासात लखलखीत प्रकाश टाकणारा 'सूर्यच' जणू. संविधानाने प्राप्त करून दिलेली लोकशाहीची शिकवण भारताच्या विकासाचा पाया मजबूत करणारी ठरत असून त्याच्या मूल्यांना पायधुळी तुडवणाऱ्याना  त्यांची योग्य ती जागा दाखवणारी आहे. स्वप्नवत वाटणारे विकासाचे कार्य संविधानातील विविध अधिकार, कर्तव्य तसेच मूल्यांमुळे शक्य होणार याची मला पूर्णता खात्री आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जागृत होणारा समाज, जगातील सर्वात मोठी लोकशाही असली तरी भारत अनेकांना पेलून, ताठ मानेने जगासमोर आपला आदर्श ठेवेल हे नक्कीच ध्यानात ठेवूया.आपल्या हक्काची जाणीव असते तसेच कर्तव्य जाणीवेने अंगीकृत करुया ! तरच संविधानाच्या स्वप्नातला भारत संपूर्ण साकार होईल. हीच भारतीयांची जबाबदारी आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पिंगळा, वासुदेव आणि तुकोबांची गाथा ! खटाव पंचायत समितीचा उन्नत माथा; जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक महोत्सव लोककलाकारांच्या चित्ररथ

संबंधित बातम्या