सातारा : मालमत्ता कर व पाणीकर थकबाकीदारांविरोधात सातारा नगरपालिकेने धडक मोहीम सुरू केली असून सोमवार, (दि. १६ ) रोजी गोडोली व विलासपूर परिसरात कारवाई करण्यात आली. रॉयल प्लाझा, संगम कॉलनी (गोडोली) येथील इमारतीतील तीन दुकानगाळे थकबाकीमुळे सील करण्यात आले.
पालिकेच्या माहितीनुसार, साई प्रसाद प्रायव्हेट लिमिटेड यांची ३,०९,०९७ रुपये, तसेच त्याच इमारतीतील बेसमेंटमधील विनोद अरुण मोरे यांची ४५,७६९ रुपये आणि अरुण पांडुरंग मोरे यांची ४२,६४७ रुपये इतकी मालमत्ता कराची थकबाकी होती. हद्दवाढ झाल्यापासून संबंधितांनी कर न भरल्याने पालिकेच्या पथकाने ही कारवाई करत तीनही गाळे सील केले.
ही कारवाई मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली प्रमुख व कर अधिकारी उमेश महादर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये भाग लिपीक दशरथ पिसे, अनिल शिंदे, सागर ननावरे, राजेंद्र शेळके तसेच कर्मचारी अविनाश अवघडे व अनिल बडेकर यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने मालमत्ता करावरील शास्ती (व्याज) माफीसाठी अभय योजना सुरू केली असून नागरिकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३१ मे २०२५ पर्यंतची शास्ती माफ करण्यात येणार असून उर्वरित कराची रक्कम भरून विहित नमुन्यात अर्ज ३१ मार्च २०२६ पर्यंत नगरपरिषदेत सादर करावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
नागरिकांनी वेळेत कर भरून दंडात्मक कारवाई टाळावी, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.