सातारा : तब्बल चार दिवस वनव्याचे भीषण कांड अनुभवल्यानंतर आणि कोट्यावधी रुपयांचे नुकसान सोसल्यानंतर सातारा पालिकेला जाग आली आहे. इंदोरच्या इको सेव्ह या कंपनीचे संचालक पुनीत शिसोदिया यांच्या विरोधात मानवी जीविकास धोका निर्माण करून पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक राकेश गलीयल यांनी सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सातारा शहरालगतच्या सात एकरामध्ये पसरलेल्या कचऱ्याच्या ढिगांना वणवा लागून आगीचे तांडव आणि अपायकारक धुराचा सामना सोनगाव, जकातवाडी लगतच्या परिसरांना करावा लागला. गेल्या चार दिवसापासून ही आग धुमसत असून अद्यापही ती विझलेली नाही. नगराध्यक्ष अमोल मोहिते उपनगराध्यक्ष एड. दत्ता बनकर यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत यंत्रणेला सूचना दिल्या तसेच आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी 48 तास सतत सोनगाव कचरा डेपोवर राहून पुन्हा आग धुमसणार नाही याची काळजी घेतली आहे. या आगीमध्ये नऊ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले सोलर पॅनल तसेच कचरा वेचक संघाच्यावतीने फुलवण्यात आलेल्या बांबूच्या शेतीला सुद्धा त्याची झळ बसली. या आगीमध्ये सातारा पालिकेचे कोट्यवधी रुपयांची नुकसान झाले.
प्रसारमाध्यमांनी वनव्याचे सत्र आणि त्याचे वृत्तांत लावून धरल्यामुळे पालिका प्रशासनावरील दबाव वाढला. नगरसेवक राजू गोरे यांनी सुद्धा संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावे अशी आक्रमक भूमिका घेतल्याने सरते शेवटी नगरपालिकेने कारवाईचे पाऊल उचलले. आरोग्य निरीक्षक राकेश गलीयल यांनी मानवी जीविकास धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करून सातारा पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करणे याला जबाबदार धरून इको सेवप्रायव्हेट लिमिटेड चे संचालक पुनीत सिसोदिया यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सातारा तालुका पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केल्याची माहिती आहे.
राकेश गलियाल यांची सुद्धा चौकशी महत्त्वाची
केवळ कंपनीच्या संचालकावर गुन्हे दाखल करून भागणार नाही तर त्यामध्ये सहभागी असणाऱ्या सातारा पालिकेच्या यंत्रणेची सुद्धा तटस्थ चौकशी झाली पाहिजे. करारामध्ये नियमाने अंतर्भूत असलेली मासिक बिले आणि प्रत्यक्ष आधार झालेली बिले यामध्ये तफावत असल्याची तक्रार आहे. बायोमायनिंग योग्य पद्धतीने होत नसताना गेल्या चार वर्षात आरोग्य विभाग ठेकेदार कंपनीला किती नोटिसा बजावल्या हे सुद्धा समोर येणे गरजेचे आहे. संबंधित कंपनीने ठेका दुसऱ्याला चालवायला दिला तेथे हरकत का घेण्यात आली नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या विभागाचे प्रमुख आरोग्य निरीक्षक गलीयल यांची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरी शिवशरण यांनी केली आहे.