चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर

प्रकाश बेळगोजी, एल. डी. पाटील, संजय वेदपाठक यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश

by Team Satara Today | published on : 04 December 2024


सातारा : साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुंफण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 

पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये चंद्रशेखर गावस, एल. डी. पाटील, राजीव मुळ्ये, संजय वेदपाठक आणि प्रकाश बेळगोजी यांचा समावेश आहे. अकादमीचे अध्यक्ष व गुंफण परिवाराचे प्रमुख डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी ही माहिती दिली. सीमा भागातील खानापूर (जि. बेळगाव) येथे २२ डिसेंबर रोजी होणाऱ्या विसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यातील प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार चंद्रशेखर गावस यांना यंदाचा गुंफण साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दोन थेंबांचे आकाश हा काव्यसंग्रह तसेच माझी भावस्पंदने हा ललित लेखसंग्रह ही त्यांची पुस्तके विशेष गाजली आहेत. या पुस्तकांना चैतन्य शब्दांगण साहित्य गौरव पुरस्कार तसेच शांता शेळके साहित्य पुरस्कार लाभले आहेत. अखिल गोमंतक युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. पुढारी व तरुण भारतमध्ये पत्रकार म्हणून काही काळ त्यांनी काम पाहिले होते. अभिनयातही त्यांनी चुणूक दाखवली आहे.

सीमा भागातील ग्रामजीवन समृद्ध करण्यासाठी योगदान देणारे बिदरभावी (जि. बेळगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते एल. डी. पाटील यांची गुंफण सामाजिक पुरस्कारासाठी निवड केली आहे. शासनाच्या विविध योजना शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी भरीव प्रयत्न केले आहेत. सातारच्या रंगभूमीचा वारसा समृद्ध करण्यात मौलिक कामगिरी बजावणारे प्रसिद्ध रंगकर्मी व पत्रकार राजीव मुळ्ये यांना गुंफण सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकरंगमंच नाट्यसंस्थेचे सदस्य असलेले राजीव मुळ्ये हे गेली चार दशके प्रायोगिक रंगभूमीवर सक्रिय आहेत.नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि संगीत संयोजन या सर्वच बाबतीत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. पत्रकारितेत तीस वर्षे त्यांनी योगदान दिले आहे.

कामगार चळवळ, साहित्य अशा विविध क्षेत्रात ठसा उमटवलेले पुण्यातील संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते संजय वेदपाठक यांना गुंफण सद्भावना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पोस्ट खात्यातील कामगार संघटनेत बारा वर्षे विविध पदांवर कार्यरत राहिलेल्या वेदपाठक यांनी कवी म्हणूनही नावलौकिक मिळवला आहे. मुक्या जीवांसाठी त्याचप्रमाणे अनाथ मुलांसाठी उदार अंतःकरणाने, सढळ हाताने मदत करून त्यांनी त्यांच्यातील संवेदनशीलता दाखवून दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब; केवळ औपचारिकता बाकी
पुढील बातमी
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन

संबंधित बातम्या