पाटण तालुक्यातील पिंपळोशी गावचे सुपुत्र बाळकृष्ण निकम सिक्कीममध्ये शहीद; शनिवारी पार्थिव आणले जाणार

by Team Satara Today | published on : 12 March 2026


सातारा : जिल्ह्यावर शोककळा पसरविणारी घटना समोर आली आहे. सिक्कीममध्ये पहाडी प्रदेशात तैनात असलेला पाटण तालुक्यातील जवान शहीद झाला आहे. बाळकृष्ण विलासराव निकम (वय ४१), असे हुतात्मा जवानाचे नाव आहे. ते पाटण तालुक्यातील पिंपळोशी गावचे सुपुत्र होते. 

हुतात्मा जवान बाळकृष्ण निकम यांचे प्राथमिक शिक्षण मेष्टेवाडी जिल्हा परिषद शाळेत झाले होते. पाटण येथील कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर बाळासाहेब देसाई महाविद्यालयात बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच २००३ साली सांगली येथे ते सैन्य दलात भरती झाले होते. पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इंजिनिअर रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून ते रूजू झाले होते. त्यांनी सियाचीन, लडाखसारख्या प्रतिकूल आणि अतिसंवदेनशील ठिकाणी सेवा बजावली.

पुढच्या वर्षी ते सेवानिवृत्त होणार होते.. 

सैन्य दलात त्यांची २३ वर्षे सेवा झाली होती. पुढच्या वर्षी ते सेवानिवृत्त होणार होते. तत्पूर्वीच त्यांना हौतात्म्य आले. सिक्कीमच्या अतिदुर्गम आणि २ हजार मीटरहून अधिक उंचीवर असलेल्या शेरावानीच्या पहाडी परिसरात ते रेडीओ ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्याठिकाणी ऑक्सिजन अभावी गुदमरून त्यांना वीरमरण आले.

शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

आपल्या सुपुत्राला वीरमरण आल्याची बातमी समजताच पिंपळोशी गाव आणि संपूर्ण पाटण तालुका शोकसागरात बुडाला. शहीद जवान बाळकृष्ण निकम यांचे पार्थिव शनिवारी विमानाने पुणे आणि तेथून लष्करी रुग्णवाहिकेने मुळगावी पिंपळोशी येथे पार्थिव आणले जाणार आहे. गावातून अंत्ययात्रा काढल्यानंतर शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, बहिण, भाऊ भावजय आणि पुतणे, असा परिवार आहे. त्यांचे चुलते सैन्य दलात होते. त्यांचीच प्रेरणा घेवून आपणही सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते भरती झाले होते. कुटुंब स्थिरस्थावर होत असतानाच नियतीने त्यांना हिरावून नेले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सिमेंट पाईपमध्ये अडकून बुडाल्याने तीन कामगारांचा मृत्यू: सातारा जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना, मृत कामगार ओडिसातील रहिवासी
पुढील बातमी
डॉ. मृदुला दाढे यांनी उलगडल्या अजरामर गाण्यांमागच्या सुरेल गोष्टी; 'तरी असेल गीत हे ' कार्यक्रमास सातारकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संबंधित बातम्या