यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सत्यजित रथ व डॉ. आनंद कर्वे आणि विज्ञान क्षेत्रात मोलाचे काम करणाऱ्या महिला शास्त्रज्ञ डॉ. चंदा निंबकर, डॉ. प्रियदर्शिनी कर्वे व डॉ. नंदिनी निंबकर, प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झिया कुरेशी आणि उपाध्यक्ष डॉ. मंजिरी निंबकर यांची उपस्थिती होती. प्रदर्शनातील एक-एक मांडणी बारकाईने पाहत आणि मुलांशी गप्पा करत या सर्वांनी मुलांची मने जिंकली.
प्रदर्शनामध्ये इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘कुतूहल’ या दालनात त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची प्रभावी मांडणी केली होती. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी वर्गात होणारी भांडणे, मोबाईलचा वापर, कुरकुरे आणि चिप्सचे सेवन, दात घासणे, आणि धूम्रपान असे दैनंदिन जीवनातील पाच विषय निवडून शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने त्यांकडे कसे बघायचे, याचा विचार करून मांडणी केली होती. सहावी ते नववीच्या वर्गांनी व्यक्त होण्याची इतर अनेक माध्यमे वापरली होती. यांमध्ये शॉर्ट फिल्म, रील्स, छायाचित्रे, खेळ, चमत्कार व हातचलाखी मागील विज्ञान दाखवणारे प्रयोग, वर्तमानपत्रातील फसव्या जाहिरातींची कात्रणे, वादविवाद, नाटक, पथनाट्य रॅप असे अनेक माध्यम प्रकार प्रभावीपणे हाताळलेले पाहायला मिळाले.
प्रदर्शन बघण्यासाठी सुमारे दोनशे पालकांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी, ता. फलटण चे पाचवी ते सातवीचे विद्यार्थीही प्रदर्शन पाहण्यास आले.
विद्यार्थ्यांनी डॉ.रथ यांच्यासोबत प्रकल्प काम सुरू करण्याच्या सुरुवातीला ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ म्हणजे काय, हे समजावून घेण्यासाठी ऑनलाइन संवाद साधला होता. प्रदर्शन पाहिल्यानंतर ‘तुम्ही मी ऑनलाइन सत्रामध्ये मांडलेल्या गोष्टींचे सोने केले, हे मलाही जमले नसते’ असे मनोगत डॉ. रथ यांनी व्यक्त केले. आधीपासून शोध लागलेल्या गोष्टींची चर्चा करतानाच ज्याची उत्तरे मानवाला गवसलेली नाहीत त्याबद्दलही मुला-मुलींनी बोलत राहावे आणि ‘का’ हा प्रश्न विचारण्यापेक्षा ‘कसे’ या प्रश्नावर विचार व्हावा, असे त्यांनी सुचवले. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक यांनी घेतलेल्या मेहनतीचे पाहुण्यांनी कौतुक केले.