सभापती निवडणुकीत ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत सागर अभंग यांचा भाजप ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

by Team Satara Today | published on : 16 March 2026


फलटण : फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीनंतर तालुक्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. सभापती पद ओबीसी समाजासाठी आरक्षित असतानाही या निवडणुकीत ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत भाजपा ओबीसी आघाडीचे फलटण तालुका अध्यक्ष तथा विडणी येथील लोकनियुक्त सरपंच सागर कांतिलाल अभंग यांनी आपल्या फलटण तालुका भाजपा ओबीसी आघाडी  तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सभापती पदाच्या निवडणुकीदरम्यान घडलेल्या घडामोडींवर नाराजी व्यक्त करत सागर अभंग यांनी जाहीर निवेदन प्रसिद्ध केले. त्यांनी म्हटले आहे की, पंचायत समितीच्या सभापती पदासाठी ओबीसी समाजाला आरक्षण असतानाही ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वाला धक्का बसला असून या निवडणुकीत ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखी घटना घडली आहे.

सागर अभंग यांनी पुढे म्हटले की, “या सभापती निवडणुकीत झालेला ओबीसी समाजावरील अन्याय मन सुन्न करणारा आहे. समाजाला आरक्षण असतानाही त्यांच्या हक्काच्या पदावर न्याय मिळाला नाही. या घटनेचा मी तीव्र निषेध करीत आहे. त्यामुळे मी माझ्या फलटण तालुका भाजपा ओबीसी आघाडी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “माझा कोणत्याही नेत्यांवर किंवा पक्ष नेतृत्वावर वैयक्तिक राग नाही. मात्र माझ्या ओबीसी समाजावर अन्याय झाला असेल तर मी गप्प बसू शकत नाही. मी पक्षाचा असलो तरी सर्वप्रथम माझ्या समाजाचा आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला न्याय का मिळाला नाही याचे उत्तर अजूनही मिळाले नाही. त्यामुळे या निर्णयाचा जाहीर निषेध करत मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.”

सागर अभंग हे विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच असून ते अनेक वर्षांपासून भाजपा ओबीसी आघाडीमध्ये सक्रियपणे काम करत होते. ओबीसी समाजातील विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्या अचानक राजीनाम्यामुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात आधीच राजकीय घडामोडींना वेग आला होता. काही सदस्यांच्या पक्षांतरामुळे आणि शेवटच्या क्षणी बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणूक विशेष चर्चेत आली होती. त्यातच आता ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप आणि सागर अभंग यांचा राजीनामा यामुळे या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढला आहे.

सागर अभंग यांच्या राजीनाम्यानंतर ओबीसी समाजात व भाजपा स्थानिक नेतृत्वाची भूमिका काय असेल, तसेच ओबीसी समाजातील कार्यकर्ते यावर कशी प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या प्रकरणावरून फलटण तालुक्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वांगणा उपसा जलसिंचन योजनेच्या जलवाहिनीला पुन्हा गळती; हजारो लिटर पाणी वाया, शेतकऱ्यांची तीव्र नाराजी
पुढील बातमी
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार

संबंधित बातम्या