वांगणा उपसा जलसिंचन योजनेच्या जलवाहिनीला पुन्हा गळती; हजारो लिटर पाणी वाया, शेतकऱ्यांची तीव्र नाराजी

by Team Satara Today | published on : 16 March 2026


सातारा : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागातील किन्हई, भाडळे व कवडेवाडी परिसरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या वांगणा उपसा जलसिंचन योजनेच्या जलवाहिनीला पुन्हा एकदा मोठी गळती लागल्याची घटना घडली आहे. बुधवार (दि. १२ मार्च) सायंकाळच्या सुमारास किन्हई गावानजीक माळावर जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. जलसंपदा विभागाने अद्याप दुरुस्तीचे काम हाती घेतले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच जलसंपदा विभागाने तातडीने पाणीपुरवठा बंद केला. दुरुस्तीच्या कामासाठी जलवाहिनी परिसरात खोदकाम करण्यात आले असून लवकरच दुरुस्ती पूर्ण करून पाणी सोडण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, २०१२ सालापासून वांगणा उपसा जलसिंचन योजनेच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून सातत्याने केला जात आहे. यामुळे जलवाहिनीला ठिकठिकाणी वारंवार गळती लागत असून उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया जात आहे. डोळ्यांसमोर पाणी वाहून जात असताना पिकांना पाणी देता येत नसल्याची खंत परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

या योजनेचे थर्ड पार्टी ऑडिट करून जलसंपदा विभागाने योजना नव्याने उभारावी किंवा निकृष्ट दर्जाची व कमी क्षमतेची जलवाहिनी बदलून नवी जलवाहिनी टाकावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबेल आणि पाण्याची नासाडीही टळेल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

यासंदर्भात वांगणा उपसा जलसिंचन योजना संघर्ष समितीचे प्रवर्तक तथा नुकतेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले हणमंतराव जगदाळे यांनी सांगितले की, सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून या विषयावर तातडीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. योजना केवळ नावालाच उरली असून शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नाही. हक्काचे पाणी वाया जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
सभापती निवडणुकीत ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत सागर अभंग यांचा भाजप ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

संबंधित बातम्या