सातारा : उमेद अभियान अंतर्गत महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनास सातारकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाच्या सात दिवसांमध्ये खाद्य पदार्थांची २१ लाख ९० हजार ३६० रुपये तर जनरल स्टॉलमध्ये ५० लाख १५ हजार ६२५ रुपये अशी तब्बल ७२ लाख ५ हजार ६२५ रुपयांची उलाढाल झाली. सातारकरांनी दिलेल्या आपुलकी व प्रेमामुळे बचत गट महिलांची 'उमेद' आणखीनच बळकट झाली आहे. अशा पद्धतीचे विक्री प्रदर्शन सातत्याने भरवले जावे, अशी मागणी सातारकर व बचत गट महिलांकडून केली जात आहे.
मुंबई महालक्ष्मी सरसच्य धर्तीवर ग्रामीण भागातील मुंबई सरसमध्ये सहभागी होण्याची इच्छा असूनही सहभागी होता येत नाही. त्यांच्यासाठी सातारा येथे दि. ७ मार्च ते १३ मार्च अखेर सात दिवसीय विभागीय सरस आयोजित करण्यात आले होते. सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील उमेद अभियान अंतर्गत कार्यरत महिलांच्या उत्पादित मालास हक्काची बाजारपेठ मिळावी आणि उद्योग व्यवसाय करण्यास इच्छुक असलेल्या महिलांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून विभागीय सरस मानीनी जत्रेचे आयोजन जिल्हा परिषद मैदानावर करण्यात आले होते.या प्रदर्शनामध्ये १५० बचत गट आपापली उत्पादने विक्रीसाठी घेऊन सहभागी झाले होते.
या प्रदर्शनात विविध भातवड्या कुरवड्या शेवया गुळ काकवी, आईस्क्रीम, मिठाई, विविध प्रकारचे कपडे, यापदार्थ सोबतच राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त कुळीथ (हुलग्याचे) सूप, पंचगव्य उत्पादने, खास डिझाईनच्या आकर्षक कोल्हापुरी चप्पल्स, लाकडी खेळणी, मूर्ती, मातीची भांडी या वस्तूंना प्रदर्शनामध्ये चांगली मागणी राहिली. प्रदर्शनास भेट देणारे लोक खरेदी बरोबरच अस्सल गावरान चवीच्या खाद्यपदार्थांवर आवर्जून ताव मारला. खाद्यपदार्थांमध्ये शहरांमध्ये नियमित उपलब्ध असलेली भेळ पाणीपुरी मंचुरियन स्प्रिंग रोल या मालवणी मासळी, दम बिर्याणी आणि भरले वांगे व मसाले भेंडी नागरिकांच्या अधिक पसंतीस उतरले.
पहिल्या दिवशी सिने अभिनेते व कला दिग्दर्शक वासू पाटील प्रस्तुत होम मिनिस्टर, गजर महाराष्ट्राचा लोकधारा महाराष्ट्राची, वीरेंद्र केंजळे प्रस्तुत हिंदी मराठी सदाबहार गीतांचा कार्यक्रम, या मनोरंजनाच्या कार्यक्रमांना रसिक श्रोत्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कलाकारांच्या कला आविष्काराने मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांनी टाळ्या शिट्ट्यांसह वन्समोरच्या मागण्यांनी मैफिलीला रंग भरला.
प्रदर्शन ठिकाणी येणाऱ्या बाल चमूंसाठीही खास उभारण्यात आलेल्या आकाश पाळणे बोट आदी खेळण्यांना ही उत्तम प्रतिसाद मिळला. एकूणच विभागीय सरस मानिनी जत्रा गावाकडच्या जत्रेची आठवण करून देत आहे. मानिनी जत्रेच्या विक्री प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिलांच्या राहण्या व जेवणाची व्यवस्था उमेद अभियानाच्या मार्फत करण्यात आली असून प्रदर्शनाच्या संयोजनासाठी प्रकल्प संचालक विश्वास सिद आणि जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा उमेद अभियान टीम अहोरात्र परिश्रम घेतले.
उच्चांकी विक्रीत सातारा-सांगली-सोलापूर अव्वल
फूड स्टॉल विभागामध्ये जस्मिन समूह, संग्रामनगर, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा. यांनी बिर्याणी, कोंबडी वडे, चिकन मटण थाळी यातून पाच दिवसात रु.९३६००/- विक्री करून प्रथम, अहिल्याबाई समूह, वळई, माण तालुका, सातारा जिल्हा यांनी ड्रायफ्रुट कुल्फी, आईसक्रीम विक्री करून पाच दिवसात रू.६०१५०/- व्यवसाय करत दुसरा तर जिजामाता समूह, तासवडे, कराड तालुका, सातारा जिल्हा यांनी रू.५७९५०/- ची थालीपीठ विकून तिसरा क्रमांक पटकविला. जनरल स्टॉल प्रकारात प्रगती समूह, कासेगाव, वाळवा तालुका, सांगली जिल्हा केक विक्रीतून रू.२,६८,२००/-, भैरवनाथ समूह, शिंदेवाडी, कवठेमहाकाळ तालुका, सांगली जिल्हा लाडू, कुरडई, गुळचिक्की विक्रीतून रू.१,६३,०००/- तर जिजाऊ समूह, जहानपूर, बार्शी तालुका, सोलापूर जिल्हा चटणी, पापड विक्रीतून रू.१,४८,३००/- उलाढाल करत अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले.