लोणंद : शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काही पालकांकडून बोगस रहिवासी दाखले आणि बनावट भाडेकरार सादर केल्याच्या चर्चेमुळे लोणंद परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकारात परिसरातील काही नामांकित शाळांचा उल्लेख होत असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
आरटीई कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत शिक्षणाची संधी दिली जाते. मात्र या योजनेचा गैरफायदा घेत काही पालकांनी आपल्या वास्तविक पत्त्यापेक्षा वेगळ्या परिसरातील पत्ते दाखवून रहिवासी दाखले काढल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी बनावट भाडेकरार तयार करून त्या परिसरात राहत असल्याचे कागदोपत्री दाखवले जात असल्याचाही आरोप केला जात आहे.
स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार, काही पालक आपल्या मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी शाळेच्या परिसरात वास्तव्यास असल्याचे दाखवणारी कागदपत्रे सादर करत आहेत. मात्र प्रत्यक्षात ते त्या ठिकाणी राहत नसल्याचे सांगितले जात आहे. काही प्रकरणांमध्ये केवळ कागदोपत्री भाडेकरार करून पत्ता बदलल्याचे दाखवण्यात येत असल्याची चर्चा देखील सुरू आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाकडून सादर केलेल्या कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. तसेच तपासणीदरम्यान बनावट किंवा चुकीची कागदपत्रे आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का, याबाबतही नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
आरटीई योजनेचा मूळ उद्देश गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी देणे हा आहे. त्यामुळे या योजनेचा गैरवापर होत असल्याच्या संशयित प्रकरणांची सखोल चौकशी करून पारदर्शकता राखण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.