दहिवडी : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना त्यांच्याच होम ग्राउंडवर राजकीय धक्क्याचा सामना करावा लागला आहे. अत्यंत चुरशीच्या आणि नाट्यमय घडामोडींनंतर माण पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला झेंडा फडकवला असून, सभापती आणि उपसभापती या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर बाजी मारली आहे. ईश्वरी चिठ्ठीने दिलेल्या कौलामुळे राष्ट्रवादीचे विक्रम शिंगाडे यांची सभापतीपदी, तर प्रियांका जगदाळे यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे.
माण पंचायत समितीच्या सत्तेचे समीकरण सुरुवातीपासूनच पेचात अडकले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांना प्रत्येकी पाच जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सभापती निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीकडून विक्रम शिंगाडे यांनी, तर भाजपकडून अर्जुन काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मतदानाच्या वेळी दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी पाच मते पडल्याने पेच निर्माण झाला. अखेर नियमानुसार ईश्वरी चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि नशिबाने राष्ट्रवादीला साथ दिली. शिंगाडे यांच्या नावाची चिठ्ठी निघताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
हीच स्थिती उपसभापती निवडीच्या वेळीही पाहायला मिळाली. या पदासाठी राष्ट्रवादीच्या प्रियांका जगदाळे आणि भाजपचे डॉ. राजेंद्र खाडे यांच्यात 'काँटे की टक्कर' झाली. येथेही मतांचे गणित ५-५ असे समसमान राहिल्याने पुन्हा एकदा चिठ्ठीचा आधार घ्यावा लागला. यामध्येही नशिबाचा कौल राष्ट्रवादीच्या प्रियांका जगदाळे यांच्या बाजूने लागल्याने भाजपला दोन्ही ठिकाणी पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात भाजपची मोठी सत्ता आणली असताना, स्वतःच्या मतदारसंघात मात्र त्यांना राष्ट्रवादीच्या रणनीतीपुढे झुकावे लागले. निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे सर्व सदस्य अज्ञातस्थळी गेले होते, जे थेट मतदानाच्या दिवशीच निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले. जिल्ह्यात भाजपचे दोन मंत्री, खासदार आणि आमदारांची मोठी फौज असतानाही, राष्ट्रवादीने खेचून आणलेले हे यश जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे. या विजयामुळे माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.