सरपंच व सदस्यांचा कार्यकाल संपलेल्या 763 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती

by Team Satara Today | published on : 11 March 2026


सातारा : सरपंच व सदस्यांचा कार्यकाल संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक म्हणून सरपंचाचीच नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दि. 10 मार्च रोजी दिले आहेत. त्यामुळे या आदेशानुसार जिल्ह्यातील 763 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांच्या हाती गावगाड्याचा कारभार आला आहे.

फेब्रुवारी 2026 अखेर सातारा जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतीमधील लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. या ठिकाणी प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया राबवली जात असताना सरपंच परिषदेने सरपंचांनांच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने आदेश जारी करत सरपंचांना अधिकार देण्याचे निर्देश दिले. या आदेशानुसार इतर काही जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया आधीच राबवण्यात आली होती.

मात्र, सातारा जिल्ह्यात ती प्रलंबित होती. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी केले. या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील 55, खटाव 81, माण 54, फलटण 68, खंडाळा 50, वाई 65, महाबळेश्वर 30, जावली 54, कराड 88, पाटण 98 व सातारा 120 असे मिळून 763 ठिकाणी सरपंचांना प्रशासकीय कामकाजाचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचांची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचे सीईओंनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या या आदेशामुळे माजी सरपंचांना पुन्हा एकदा गावचा कारभार सांभाळण्याची संधी मिळाली आहे. प्रशासक म्हणून सरपंच ग्रामपंचायतीचे दैंनदिन कामकाज, योजनांची अमंलबजावणी आणि वित्तीय बाबीवर नियंत्रण ठेवणार आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'मोकाट' बुलेटस्वारांना फलटण पोलिसांचा दणका; १० दिवसांत २०७ केसेस, दीड लाखांहून अधिक दंड वसूल
पुढील बातमी
गॅस सिलिंडरची टाकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा; बहुतेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती

संबंधित बातम्या