कोणीच धक्क्यातून सावरलेले नाही... त्यामुळे मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला - खा. उदयनराजे भोसले; कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करू नये

by Team Satara Today | published on : 08 February 2026


सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा आहे. कोणीच धक्क्यातून सावरलेले नाही. त्यामुळे मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. कार्यकर्त्यांनीही वाढदिवसाचे सोहळे आयोजित न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अजितदादा म्हणजे 'कामाचा माणूस' आणि 'दिलदार नेते' होते. आमच्यात अनेकदा वैचारिक मतभेद झाले. परंतु, मनभेद कधीच नव्हते, अशी देखील भावना उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा आहे. या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. २४ फेब्रुवारीला उदयनराजेंचा वाढदिवस असतो. मात्र, अजितदादांच्या निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरला नसल्याने आपल्या वाढदिवसाचा कसलाही सोहळा आयोजित न करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

अजित पवार यांच्या आठवणींने उदयनराजे भावूक

अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उदयनराजेंनी अत्यंत भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उदयनराजे म्हणतात की, महाविद्यालयीन जीवनापासून आमच्यात सुरू झालेल्या मैत्रीचे रूपांतर घट्ट ऋणानुबंधात झाले होते. अजितदादा म्हणजे 'कामाचा माणूस' आणि 'दिलदार मनाचे नेतृत्व' होते. आमच्या मैत्रीत अनेकदा वैचारिक मतभेद झाले असले तरी मनभेद कधीच नव्हते आणि राज्याचे हीत, हेच दोघांचेही लक्ष्य होते. दादांच्या जाण्याने मनाला लागलेला चटका आणि झालेली घालमेल शब्दांत मांडणे कठीण आहे.

अजित पवार यांच्या अकाली निधनासारख्या दुःखद प्रसंगामुळे सातारा जिल्हा आणि राज्यातील कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे आवाहन उदयनराजेंनी केले आहे. कोणाला सामाजिक उपक्रम करायचा असेल, तर त्यासाठी वाढदिवसाचे निमित्त साधू नये आणि त्याचा कोणताही गाजावाजा किंवा प्रसिद्धी करू नये, अशी कडक सूचनाही उदयनराजेंनी दिली आहे. माझी ही आंतरिक तगमग आणि भावना समजून घ्यावी, असे आवाहन त्यांनी चाहत्यांना केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मतदार जागृती ही निरंतर प्रक्रिया - यशेंद्र क्षीरसागर; मतदान करणे ही सहज भावनेने केलेली उत्स्फूर्त कृती असावी
पुढील बातमी
भारत-अमेरिका कराराच्‍या निषेधार्थ शेतकरी संघटनांकडून १२ फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक

संबंधित बातम्या