सातारा : शहरातील देशपातळीवर नावाजलेल्या एका केंद्रीय शाळेतील २४ अल्पवयीन विद्यार्थ्यांवर एका वॉर्डबॉयने अत्याचार केल्याची घटना दि. ७ रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी वॉर्डबॉय ऋषिकेश सुभाष चव्हाण (रा. खंडाळा, सध्या रा. सदर बाजार, सातारा) याच्यावर पोक्सो अंतर्गत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरुवातीला तीन मुलांवर अत्याचार केल्याची नोंद शनिवारी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी शाळेत जाऊन वसतिगृहातील विद्यार्थ्यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले. यावेळी तब्बल २४ मुलांनी अशा प्रकारचा लैंगिक व मानसिक छळ झाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.
या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यासंदर्भात अधिक भाष्य करण्यास टाळाटाळ केली.
शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी वॉर्डबॉयविरोधात ‘बॅड टच’, पैसे मागणे, धमक्या देणे आणि मारहाण करणे अशा तक्रारी केल्या आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित वॉर्डबॉयविरुद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शाळा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित वॉर्डबॉयने सकाळी साडेसहा वाजता तीन शाळकरी मुलांशी चार ते पाच वेळा अश्लील कृत्य केले. या प्रकारामुळे मुले भयभीत झाली होती. वॉर्डबॉयने केलेला हा घृणास्पद प्रकार काही मुलांनी आपल्या पालकांना तसेच शाळेतील शिक्षकांना सांगितला. त्यानंतर शाळा व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून विद्यार्थ्यांना धमकी देण्यात आली होती. तसेच मुलांना मारहाण करून त्यांचे हात पिरगळणे आणि डोके आपटणे अशा प्रकारे त्यांना त्रास देण्यात आला. हा धक्कादायक प्रकार २५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी तसेच ७ मार्च २०२६ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित वॉर्डबॉयवर बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.