सातारा : भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असणाऱ्या संपूर्ण सातारा तालुक्यामध्ये सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अंदाजे 60% मतदान झाले .सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एक लाख 52 हजार 175 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. साधारण 60.5 इतकी मतदानाची टक्केवारी नोंदवण्यात आली.
कृष्णानगर येथील मतदान क्रमांक 34 वर भाजपचे उमेदवार संदीप शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार कामेश कांबळे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्यामुळे तणावाचे वातावरण होते. सातारा पोलिसांनी तत्काळ तेथे जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पाठखळ लिंब खेड, कोडोली, कारी शेंद्रे, वर्णे, नागठाणे या आठ 16 गणांसाठी 46 उमेदवार रिंगणात होते. सोमवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून तालुक्यातील 371 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या पहिल्या दोन तासांमध्ये साधारण सरासरी 9.26% इतकी मतदानाची नोंद झाली यामध्ये मध्ये सर्वाधिक कोडोली गटामध्ये11.5 टक्के मतदान नोंदवले गेले.
येथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यामध्ये काही गटांमध्ये दुरंगी सामना राहणार आहे. विशेषता खेडच्या गटांमध्ये राजकीय उत्सुकताप पणाला लागली होती .साधारण बारा वाजल्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेचा वेग वाढला दुपारी तीन वाजेपर्यंत 47.16% मतदानाची नोंद झाली. सातारा पोलिसांचा सुमारे साडेपाचशे पोलिसांचा बंदोबस्त तालुक्यामध्ये उपलब्ध होता. प्रत्येक मतदान केंद्रांवर एक मतदान केंद्राध्यक्ष तीन मतदान अधिकारी आणि दहा टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले होते.
सर्व मतदान केंद्रांवर नागरिकांनी रांगेत जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सातारा तालुक्यात काही ठिकाणी किरकोळ तक्रारी वगळता सर्व मतदान शांततेमध्ये पार पडले .पाठखळ येथे काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी होत्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली असता तसे काही घडले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. आबालवृद्धांनी 371 मतदान केंद्रांवर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावत आपल्या लोकशाही शासन पद्धतीचे कर्तव्य पूर्ण केले. साताऱ्यात सरासरी साधारण 60.5% मतदान झाल्याचे रात्री उशिरा सांगण्यात आले त्यामुळे साताऱ्यात राजकीय बदलाची उत्सुकता निर्माण झाली आहे.