सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज राज्यातच नव्हेतर देशात अत्यंत चांगले असलेचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांनी बँकेस दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी काढले. यावेळी बँकेचे संचालक व महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री. मकरंद पाटील, बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, सचिन पाटील, बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक, प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, प्रदिप विधाते, सुनिल खत्री, रामराव लेंभे सुरेश सावंत, लहुराज जाधव, संचालिका सौ. कांचन साळुंखे, सौ. ऋतुजा पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजेंद्र गाढवे, राजेंद्र भिलारे उपस्थित होते. याप्रसंगी ना. अजितदादा पवार यांचा बँकेमार्फत यथोचित सत्कार करणेत आला .
मा. ना. अजितदादा पवार म्हणाले, बँकेने चांगला नावलौकिक मिळविला असून तो कायम टिकविणेसाठी सातत्य व गुणात्मक कामकाज करणे आवश्यक आहे. बँकेचे प्रशासन व व्यवस्थापन उत्तम आहे. बँकेत आर्थिक शिस्त पाळली जाते. कर्ज वाटप करताना निकष विचारात घेवूनच कर्ज वाटप केले जाते व राजकारणविरहीत कामकाज केले जाते, त्यामुळे बँक सक्षम आहे. बँकेची कर्ज वसुली चांगली आहे. एनपीए चे प्रमाण अत्यंत कमी आहे. बँकेला चालू वर्षी नफा चांगला झालेला आहे. बँकेच्या सर्व शाखा नफ्यात आहेत. बँक संलग्न ९६९ विकास सेवा संस्थांपैकी ९२१ विकास संस्था नफ्यात आलेल्या आहेत ही अत्यंत चांगली बाब असलेचे सांगून बँकेचा प्रगतीपर आलेख उंचावत ठेऊन बँकेची गौरवशाली परंपरा कायम ठेवलेबद्दल पुढील वर्षाच्या कामकाजास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ना. मकरंद पाटील म्हणाले, बँकेची स्थापना स्व. यशवंतराव चव्हाण, आर .डी .पाटील, किसन वीर इ . थोर नेत्यांनी सर्वसामान्य शेतक-यांची उन्नती व्हावी यासाठी केली. बँकेच्या ठेवी, कर्ज, भागभांडवल, स्वनिधी बँकेचा मिश्रव्यवसाय यामध्ये भरघोस वाढ झालेली आहे. बँकेने डिजिटल बँकिंगमध्ये चांगले कामकाज केले असून इन्फोसिस कंपनीचे साफ्टवेअर खरेदी केले असून ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सर्व सेवा सुविधा तत्पर व वेळेत मिळत आहेत.
बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी बँकेच्या प्रगतीपर कामकाजाची माहिती विषद केली. सातारा जिल्हा बँकेचे कामकाज उत्कृष्ट असलेमुळेच बँक देशामध्ये सहकार क्षेत्रात अव्वल स्थानी असून बँकेस नाबार्ड तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविले असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये ‘सहकार क्षेत्रातील सर्वोच्च बँक’ म्हणून बँकेची नोंद झालेली आहे.
डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा तसेच जिल्हा बँकेच्या अडीअडचणी संदर्भात माहिती दिली. यामध्ये बँकेने मार्च २०२५ अखेर संमिश्र व्यवसाय १९ हजार कोटीहून अधिक, बँकेचा नक्त नफा १०१ कोटी तसेच रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व रेशो आदर्श प्रमाणात ठेवणेत यशस्वी झालेचे सांगितले. बँक जिल्ह्यातील सर्व शेतकरी व विकास सेवा सोसायट्यांचे सक्षमीकरणासाठी राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देणेत आली.
याप्रसंगी ना. मकरंद पाटील, अध्यक्ष श्री. नितीन पाटील, उपाध्यक्ष आणि सर्व संचालक महोदय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँकेच्या कामकाजातील विविध अडचणीबाबत सविस्तर चर्चा केली. यामध्ये राज्य मंत्रिमंडळाने अलिकडेच विकास सोसायट्यांसाठी केडर संरचनेची पुनर्स्थापना करणेचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून यासाठीची नियमावली अद्याप प्रलंबित असलेने अंमलबजावणी होत नसलेची बाब मा. उपमुख्यमंत्री महोदय यांचे निदर्शनास आणून दिली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १९६० चे कलम २८ नुसार विकास सोसायट्यांच्या सभासदांनी धारण करावयाच्या शेअर्सची अधिकतम मर्यादा रक्कम रु. २०,०००/- वरून रक्कम रु. ५००००/- करणेबाबत मागणी केली. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत एकाच आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्जाची उचल करून वेळेत परतफेड केलेल्या सातारा जिल्हयातील १० ते १२ हजार शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजनेपासून वंचित राहिले आहेत. याबाबत स्वतंत्र जी.आर. काढून अनुदान देणेची कार्यवाही करणेचे आश्वासन यावेळी मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी दिले.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने अल्प मुदत पीक कर्जावरील व्याज वसुलीबाबत दि १८/६/२0०७ रोजी काढलेल्या जी-आर संदभर्भात मा. सहकार आयुक्त, पुणे यांनी माहे मार्च २०२४ मध्ये काढलेल्या परिपत्रकासंदर्भातही चर्चा करणेत आली. सदर बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर याही निर्णयाचा फेरविचार करणेची ग्वाही मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी दिली. महाराष्ट्र शासनाचा इतर महामंडळाकडील निधी गुंतवणूक व शासकीय निधी, कर्मचाऱ्यांचे पगार वितरणाबाबत मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन कार्यवाही करणेबाबत तसेच वर नमूद मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेणेचे अनुषंगाने मा. सहकार आयुक्त, पुणे यांनाही सूचित केले.