सातारा : कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या कामकाजावरून आज विधान परिषदेत जोरदार गदारोळ झाला. कोरेगाव पोलीस ठाण्यातील कथित भ्रष्ट आणि हेकेखोर कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांना तात्काळ निलंबित करून चौकशी सुरू करावी, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. मात्र यावर उत्तर देताना राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची अडचण झाल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. विरोधकांनी यावेळी केवळ निलंबन नव्हे तर अशा अधिकाऱ्याला थेट शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीही जोरदारपणे मांडली.
गेल्या काही दिवसांपासून कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या कामकाजाबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. त्यांच्या एकतर्फी कारभारामुळे कोरेगाव पोलीस ठाणे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे आरोप करण्यात येत आहेत. शशिकांत शिंदे यांनी सभागृहात बोलताना राज्यात, विशेषतः सातारा जिल्ह्यात, काही प्रशासकीय अधिकारी स्थानिक सत्ताधारी आमदारांच्या मर्जीने काम करत असल्याचा आरोप केला. डीवायएसपी, ठाणेदार, प्रांत अधिकारी आणि तहसीलदार अशा पदांवर कार्यरत अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात काम करताना सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बल्लाळ हे गेली तीन वर्षे या ठाण्याचे प्रभारी आहेत. मात्र या काळात त्यांनी स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या पूरक भूमिका घेतल्याचा आरोप शिंदे यांनी केला. गेल्या तीन वर्षांत कोरेगाव तालुक्यात खून, मारामारी, दरोडे तसेच विविध अवैध धंद्यांमध्ये वाढ झाल्याचा मुद्दाही त्यांनी सभागृहात उपस्थित केला. यामुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा दावा त्यांनी केला.
या संदर्भात शशिकांत शिंदे यांनी यापूर्वीही कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासमोर बल्लाळ यांच्या कामकाजाबाबत तक्रारी मांडल्याचे सांगितले. तसेच बल्लाळ यांच्या कथित गैरप्रकारांचा पेनड्राईव्हही त्यांनी यापूर्वी विधान परिषदेत सादर केला होता. अनेक तक्रारी असूनही संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा सभागृहात मांडला.
सभागृहात बोलताना शशिकांत शिंदे यांनी थेट प्रश्न उपस्थित करत “घनश्याम बल्लाळ हे सरकारचे जावई आहेत काय?” असा सवाल केला. कोरेगाव तालुक्यात अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा दावा करत त्यांनी अल्पवयीन मुलींच्या प्रकरणातही तक्रारी घेतल्या जात नसल्याचे सांगितले. पालक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले तरी त्यांची दखल घेतली जात नसल्याचे आरोप त्यांनी केले. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी सरकारवर राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार भाई जगताप यांनीही शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देत संबंधित पोलीस निरीक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, या प्रश्नावर उत्तर देताना राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांना विरोधकांच्या प्रश्नांचा सामना करताना अडचणीत आल्याचे दिसून आले. त्यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याचे सांगत विरोधकांनी सभागृहात अधिक आक्रमक भूमिका घेतली.
कोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी घनश्याम बल्लाळ यांच्यावर इतके गंभीर आरोप होऊनही त्यांच्यावर कारवाई का होत नाही आणि त्यांना कोण पाठीशी घालत आहे, असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. या प्रकरणामुळे विधान परिषदेत काही काळ वातावरण तापलेले पाहायला मिळाले.