सातारा : देशभरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन १८ आणि १९ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यात उदगीर येथे होत असून सातारा जिल्ह्याचे सुपुत्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले हे या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असतील, अशी घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे.
पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्या आणि ८७ वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे दर दोन वर्षांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात राष्ट्रीय अधिवेशन होते. यापुर्वी रोहा, पिंपरी-चिंचवड, शेगाव, नांदेड येथे परिषदेची अधिवेशन झाली. यावेळेस उदगीर येथे अधिवेशन होत असून अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे.
"मी नक्की येतो" असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला
परिषदेच्या शिष्टमंडळाने अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, स्थानिक आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी परिषदेची विनंती मान्य केली असून "मी नक्की येतो" असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, परिषदेचे मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, परिषदेचे लातूर विभागीय सचिव तथा अधिवेशनाचे प्रमुख संयोजक सचिन शिवशेट्टे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे चेअरमन हरिष पाटणे, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे, संयोजन समितीचे युवराज धोतरे उपस्थित होते.
मराठी पत्रकारांच्या दृष्टीने गौरवाचा सोहळा असलेल्या परिषदेच्या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, लातूर विभागीय सचिव तथा प्रमुख संयोजक सचिन शिवशेट्टे, संभाजीनगर विभागीय सचिव रवी उबाळे, संयोजन समितीचे श्री. युवराज धोतरे आदिंनी केले आहे.
ना. शिवेंद्रसिंहराजे स्वागताध्यक्ष हा सातार्याचा सन्मान - हरीश पाटणे
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वारसदार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मराठी पत्रकार परिषदेने स्वागताध्यक्ष करून एक प्रकारे सातारा जिल्ह्याचा सन्मान केला आहे. त्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेला सातारा जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून धन्यवाद देतो. परिषदेच्या अधिवेशनांमध्ये सातारा जिल्ह्याने कायमच योगदान दिले आहे. मराठी पत्रकार परिषदेचा सातारा जिल्हा हा बालेकिल्ला आहे. सातारा जिल्ह्याची समस्त पत्रकारीता मराठी पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली आजवर एकत्र ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या रूपाने साताऱ्याचे सक्रिय योगदान परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात राहील. ना. शिवेंद्रराजे यांच्या निवडीचा आम्हा सर्वांना अभिमान आहे, अशा शब्दात पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांनी उदगीर येथील मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित रहावे
राज्यातील तमाम पत्रकारांचे अनेक प्रश्न सोडवण्याची भूमिका अधिवेशनाच्या माध्यमातून घेतली जाते. यंदा मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिंवेद्रराजे भोसले अधिवेशनासाठी लाभणार आहेत. या अधिवेशनास देशभरातून ३००० पत्रकार येतील असा अंदाज असून त्यादृष्टीने व्यवस्था करण्यात येत आहे. अधिवेशनासाठी उदगीर येथे कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे. देशभरातील पत्रकारांनी उदगीर येथील मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित रहावे.
एस.एम.देशमुख, मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद.