सातारा : सातारा पालिकेच्या मालकीचा सोनगाव कचरा डेपो वनव्यामुळे धुमसत असतो. येथील धुरामुळे व दुर्गंधीमुळे ग्रामपंचायत जकातवाडी सोनगाव साठेवाडी, डबेवाडी या गावातील नागरिकांना सातत्याने त्रास होत आहे. वनवा आणि त्यानिमित्ताने निर्माण होणारा धूर याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जकातवाडी गावच्या सरपंच अश्विनी दळवी यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास जकात वाडी ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कचरा डेपोला सातत्याने लागणाऱ्या आगीमुळे व दुर्गंधीमुळे सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. सोनगाव, साठेवाडी, डबेवाडी, जकातवाडी येथील नागरिकांना वयोवृद्ध व लहान मुलांना आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. टाकलेल्या कचऱ्याचा त्रास शेजारील गावांना व नागरिकांना होत आहे. कचऱ्याचे शास्त्रीय संकलन योग्य पद्धतीने होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. या विषयावर सातारा नगरपालिकेने लवकरात लवकर योग्य तो उपाययोजना करावी अन्यथा जकात वाडी ग्रामस्थ नगरपालिकेसमोर येऊन आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.