सातारा : श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर ट्रस्ट आयोजित महाशिवरात्री संगीत महोत्सवातील आठवे पुष्प सादर करताना पुणे येथील नंदिता देशपांडे -कुलकर्णी यांच्या तब्बल 23 कलाकारांनी सादर केलेल्या नृत्य पुष्प या कथ्थक नृत्य कार्यक्रमाला सातारकरांची प्रचंड वाहवा मिळाली. या कार्यक्रमात सादर झालेल्या अनेक कथक नृत्यांना उपस्थित शेकडो प्रेक्षकांनी मनापासून दाद देत वन्समोरची ही मागणी केली.
अशा या रंगलेल्या कार्यक्रमाची सुरुवात नंदिता देशपांडे- कुलकर्णी यांनी निवेदन करून ..विनायक स्तुती.. या गणेश वंदनेने केली.
प्रसिद्ध लेखिका आणि संगीतकार बागेश्री वझे यांचे हे गीत सादर झाल्यावर या नृत्यातील ताल म्हणजे कथक नृत्याचा प्राण असलेला.. तालपक्ष ..सादर करण्यात आला.यामध्ये त्रिताल, झप ताल, आदी ताल यासारख्या तालांमध्ये नर्तक आपल्या हस्त ,पदसंचालनाने चित्र रंगवतो. आणि हा 14 मात्रांचा ताल यावेळी सादर करण्यात आला त्यानंतर.. लपक झपक ..ही बंदिश ..ए ब्रिज शाम..या अल्बम मधून सादर करण्यात आली .सुप्रसिद्ध नर्तक पंडित बिरजू महाराज यांची ही बंदिश सादर होताना उपस्थित सातारकर प्रेक्षकांनी कलाकारांना टाळ्यांच्या गजरात दाद दिली .त्यानंतर नृत्य देवता नटराजाचे वर्णन असणारी ..कलेश्वरा.. ही रचना सादर करून नृत्यालयाच्या लहान मुलींनी ..मल्हार रंग.. म्हणजेच मल्हार रागातील पाऊस दर्शवणारा राग मिया मल्हार मध्ये सादर करण्यात आली .शारदा देवीची स्तुती असणारे स्तवन अर्थात.. नमो नमो तु शारदे.. सादर करण्यात आले .ही रचना आर्या आंबेकर यांनी गाऊन सुप्रसिद्ध केली आहे. त्यानंतर कृष्णाला भेटायला चाललेल्या नाइकेचे वर्णन असणारी रचना अतिशय सुरेखपणे सादर होऊन सुप्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांनी केलेली.. घनवदन.. ही कृष्ण भक्ती दंग झालेली राधिका आणि तिचे नृत्य या कलाकारांनी सादर करताना रसिक मंत्रमुग्ध झाले. लेखिका सावरिवर्मा यांनी असलेली आणि सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी म्हटलेली नायिका आणि गोपिकांचा कृष्ण त्यांची छेडछाड, वाट अडवणे, लटके रागावणे व लाजत मुरडणे अशी ही सुंदर रासलीला नृत्यातून पाहायला मिळाली. आपल्या या रंगलेल्या कार्यक्रमाचा समारोप.. कालभैरवाष्टक ..सादर करून कलाकारांनी केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन नंदिता कुलकर्णी आणि पत्रकार अतुल देशपांडे यांनी केले. यावेळी महोत्सवाच्या संयोजिका सौ. उषा शानभाग व पत्रकार अतुल देशपांडे यांचा विशेष सत्कार नंदिता कुलकर्णीच्या अर्पित नृत्यालय संस्थेतर्फे करण्यात आला .या सर्व 23 कलाकारांचा सत्कार मंदिराच्या वतीने सौ.कांचन शहाणे, व सौ.उषा शानभाग यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी वासुदेवन नायर,मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन,नारायण राव यांचे सह सातारा परिसरातील अनेक नृत्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते .