माता रमाई आंबेडकर आदर्श स्त्रीत्वाच्या प्रतीक - यशेंद्र क्षीरसागर; सौ. लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहामध्ये जयंतीनिमित्त विद्यार्थिनींना मार्गदर्शन

by Team Satara Today | published on : 07 February 2026


सातारा  : "माता रमाई आंबेडकर या आदर्श भारतीय स्त्रीत्वाच्या प्रतीक आहेत. महान त्यागमूर्ती असणाऱ्या रमाई यांनी विश्वरत्न, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीर साथ दिली. म्हणूनच बाबासाहेब यांनी 'होत्या रमा म्हणून घडले भिमा' असे सार्थ उद्गार काढले होते," असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.

येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहामध्ये माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना श्री. क्षीरसागर बोलत होते. यावेळी अधीक्षिका श्रीमती स्वाती जगताप तसेच श्री. संजय लेंडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. क्षीरसागर म्हणाले ,"माता रमाई यांनी प्रचंड गरिबीमध्ये, हालअपेष्टांमध्ये जीवन व्यतीत केले .परंतु त्यांनी कधीही आपल्या जीवनाविषयी तक्रार केली नाही. रात्रंदिवस कष्ट करून बाबासाहेबांचा संसार सांभाळला. एकदा त्यांनी वसतिगृहातील धारवाडच्या विद्यार्थ्यांसाठी दागिने सुद्धा विकले.  समाजाने देऊ केलेली मदत स्वाभिमानी वृत्तीने नाकारली.

बाबासाहेब यांचे जीवन, सामाजिक चळवळ आणि समाजकार्य पाहता त्यांनी दिलेली साथ अत्यंत मोलाची होती. त्यांची साथ ही बाबासाहेबांसाठी महत्वाची ऊर्जा होती. रमेश, राजरत्न, गंगाधर आणि इंदू अशा स्वतःच्या चार लहान अपत्त्यांचा मृत्यू डोळ्यादेखत पहाव्या लागलेल्या रमाई यांनी न खचता निधनापर्यंत म्हणजेच १९३५ पर्यंत  कष्ट केले. प्रसंगी शेण्यासुद्धा थापल्या. परंतु कधी तक्रार केली नाही. १८९८ ते १९३५ असे केवळ ३७ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. परंतु तेच आयुष्य सफल झाले. विद्यार्थिनींनी ही बाब लक्षात घ्यावी. आहे त्या परिस्थितीत खूप अभ्यास करून जीवन घडवावे. माफी, अभिनंदन, धन्यवाद अशा सामाजिक मूल्यांचा अंगीकार करावा. "द्या म्हणजे मिळेल" हे तत्व मनात बाळगावे. म्हणजेच शक्य तेवढे दान करावे. चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन द्यावे .म्हणजेच जीवन सकारात्मक पणे घडेल."

अधीक्षिका श्रीमती जगताप यांनी आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोंडवे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल निंबाळकर; व्हाईस चेअरमनपदी भरत शंकर चोरगे
पुढील बातमी
पाल गटात शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला, भाजप उमदेवाराच्या भावाने केली मारहाण

संबंधित बातम्या