सातारा : गेली पंधरा दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाच्या कोसळदारांनी सातारा जिल्ह्यातील जुलै महिन्याचा बॅकअप खऱ्या अर्थाने भरून निघाला. नेहमीच सुजलाम सुफलाम असणाऱ्या या सातारा जिल्ह्याला या पावसानंतर हिरवाईचे एक वेगळेच लेणे प्राप्त झाले आहे. सातारा- पुणे रस्त्यावरील खंबाटकी घाटातून या हिरव्या निसर्गाचे विहंगम दर्शन आपणाला या फोटो फीचर द्वारे करीत आहोत.
हिरव्या गर्द झाडीतून नागमोडी वळणे घेत पार केली जाणारी ही घाटाची अवघड वाट प्रवाशांबरोबरच वाहन चालकांनाही तितकीच सुखकर करत आहे. पुण्याच्या बाजूने खंबाटकी घाटाचा रस्ता चढत असताना वळणा वळणावर दिसणारी लांब वर असूनही आपल्या प्रचंड पात्राने तुडुंब भरून वाहणारी निरा नदी तसेच या घाटात सुरू असलेले एस वळण काढून तेथे होणारा नवीन महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे एवढेच नव्हे तर हा घाट उतरून आल्यावर भुईंज कडे येत असताना परिसराने नेसलेला हिरवा शालू अगदी दोन्ही रस्त्याच्या दुभाजकात उगवलेली हिरवीगार झाडी ही तितकीच वाऱ्यावर डोलताना पाहताना प्रत्येकाचे मन खऱ्या अर्थाने तृप्त होते.