दिल्ली : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने या प्रकरणात आपचे नेते मनीष सिसोदिया यांचीही निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुनीता केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर लिहिलं की, "या जगात कोणी कितीही शक्तिशाली झालं तरी, तो 'शिवशक्ती'पेक्षा मोठा होऊ शकत नाही. सत्याचा नेहमीच विजय होतो." मद्य घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी भ्रष्टाचारी नाही, देव माझ्या पाठीशी आहे आणि सत्याचाच विजय होतो. हे संपूर्ण प्रकरण बनावट होतं आणि आमचा पक्ष संपवण्याचा हा एक कट होता, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, "आम आदमी पक्षाच्या पाच मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं गेलं. इतकंच नाही तर, एका कार्यरत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरातून अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आलं, जे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडलं नव्हतं."
मनीष सिसोदिया यांनीही 'एक्स'वर आपली प्रतिक्रिया दिली. "सत्यमेव जयते! आज पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी आणि त्यांनी बनवलेल्या संविधानाचा अभिमान वाटत आहे. मोदीजींचा पूर्ण पक्ष आणि सर्व यंत्रणांनी आम्हाला चुकीचे सिद्ध करण्याचे सर्व प्रयत्न करूनही आज हे सिद्ध झालं की अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे 'कट्टर प्रामाणिक' आहेत" असं म्हटलं आहे.