सातारा : राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली मिळावा आणि महसूल यंत्रणा प्रत्येक गावापर्यंत पोहोचावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे. या शिबिराचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा व शासनाच्या योजनांपासून एकही व्यक्ती वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासन दक्ष असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिली.
कोरेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयाच्या वतीने अभियानाच्या टप्पा क्र. १ अंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सातारारोड येथील यशोदीप मंगल कार्यालयात शनिवारी दिवसभर आयोजित करण्यात आला होता. या शिबिराचा शुभारंभ प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, काडसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. अरुणाताई बर्गे, सातारारोड ग्रामपंचायतीचे सदस्य रत्नदीप फाळके, शहाजी कांबळे, पंचायत समिती सदस्य डॉ. संजय आवडे, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, नायब तहसीलदार शारदा खाडे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव आदींच्या उपस्थितीत झाला.
कुदळे पुढे म्हणाले की, कोरेगाव तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळात हे अभियान राबविण्यात येणार असून महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ नागरिकांना दिला जाणार आहे. तसेच विविध कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या कामांचा आढावा घेऊन ते प्रश्न जागेवर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी सांगितले की, कोरेगाव तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ तसेच कोरेगाव आणि रहिमतपूर शहरात हे अभियान टप्प्याटप्प्याने मे महिन्यापर्यंत राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात कोरेगाव तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेच्या वतीने लाभार्थ्यांना डिजिटल शिधापत्रिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भूमीअभिलेख विभागाचे शिरस्तेदार विनायकराव जाधव यांनी विविध योजनांची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव यांनी महाविस्तार ॲप विषयी सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांना ते मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास मार्गदर्शन केले.
या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सातारारोड महसूल मंडळातील जवळपास प्रत्येक गाव व वाडी-वस्तीवरील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. दिवसभरात ६६ विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच ई-मोजणी, प्रॉपर्टी कार्ड, वारस नोंद, नकाशा वाटप, ॲग्री स्टॅक, पीएम किसान अंतर्गत लँड सीडिंग, आधार सीडिंग व केवायसीसाठी एक खिडकी योजनेतून ८६ नागरिकांनी लाभ घेतला.
याशिवाय भूसंपादन प्रकरणांमध्ये कमी-जास्त पत्रके तयार करून गावदप्तर अद्ययावत करण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या ३५ आहे. सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांना मदत देण्यात आली. ३६ नागरिकांना सातबारा उतारे उपलब्ध करून देण्यात आले. तसेच ३५ फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली. सातबारा दुरुस्तीसाठी सहा अर्ज प्राप्त झाले असून ७३ नागरिकांना डिजिटल सातबारा आणि ३३ नागरिकांना डिजिटल आठ उताऱ्यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्राम महसूल अधिकारी रामभाऊ देवकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर मंडळ अधिकारी अशोक तारळकर यांनी आभार मानले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक महसूल अधिकारी विलास जाधव, महसूल सहाय्यक वैभव सावर्डेकर यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.