कराड : नवमहाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीतीसंगमावर भेट देऊन त्यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
सकाळी प्रीतीसंगमावर आगमन झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी स्व. चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमावर असलेल्या या स्मारकस्थळी त्यांनी काही काळ थांबून परिसराची पाहणीही केली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, स्व. यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि कार्य हे आजही प्रेरणादायी आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अतुलनीय असून प्रीतीसंगम हे केवळ स्मारक नसून माझ्यासाठी श्रद्धास्थान आणि ऊर्जास्थान आहे. येथून मिळणारी प्रेरणा जनसेवेच्या कार्यासाठी नवे बळ देते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते. जयंतीनिमित्त कराड शहरात आणि प्रीतीसंगम परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळपासूनच अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.