सातारा : सातारा जिल्हा कारागृह येथे शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास दवाखाना विभागासमोर एका न्यायाधीन बंदीवानाने शिवीगाळ व दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित बंदीवानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारागृह शिपाई संजय पवार (वय - ४२) यांनी तक्रार दिली आहे. संशयित आरोपी म्हणून न्यायाधीन बंदी गजानन युवराज जाधव (मुळ. रा. खेड, ता. जि. सातारा; सध्या रा. सातारा जिल्हा कारागृह) याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांची माहिती अशी : येथील दवाखाना विभागासमोर संबंधित बंदीवान हा तुरुंग अधिकारी श्रीमती कुंटे यांच्याकडे एकटक पाहत उभा होता. त्याला नीट उभे राहण्यास सांगितल्यावर त्याने संतापून अश्लील शिवीगाळ करत अंगावर धाव घेत ढकलाढकली केली. दरम्यान, कारागृह शिपाई पवार यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्या शर्टची कॉलर पकडून मारहाण केली व धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. संबंधित संशयितांवर याप्रकरणी शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ व मारहाणीबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस पुढील अधिक तपास करत आहेत.