मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरातून एकूण 10 हजार 905 उमेदवारी अर्ज सादर करण्यात आली आहेत. ज्यामधये 288 मतदारसंघातून 7 हजार 995 उमेदवार प्रतिनिधित्व करत आहेत. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 ऑक्टोबर 2024 रोजी लागू करण्यात आली आहे.
निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली होती. मंगळवारी (दि.29) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. या सर्व अर्जांची बुधवारी (दि.30) छाननी होणार आहे. तसेच, 4 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. मागील काही दिवसांमध्ये सी - व्हिजिल अर्जावर आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या 1,648 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यासर्व निवडणूक आयोगाने सोडवल्या आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले. सतर्क नागरिकांना आचारसंहितेचे पालन करण्यास मदत करणारे सी-व्हिजिल ॲप कोणत्याही ॲप स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदवता येतील असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.