गोडोलीत एकनाथ रेसिडेन्सीत बिबट्याची पिल्ले; पिल्ले वनविभागाच्या ताब्यात, बिबट्या व पिल्ले यांची पुन्हा भेट घडविण्याचे अथक प्रयत्न सुरू

by Team Satara Today | published on : 26 November 2025


सातारा  : गोडोली शाहूनगर परिसरातील एकनाथ रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मंगळवारी मध्यरात्री दोन बिबट्या ची पिल्ले आढळून आली ही पिल्ले दोन महिन्याची आहेत. नागरिकांनी खबर दिल्यानंतर सातारा वनविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन ही पिल्ले ताब्यात घेतली. सातारा वनविभागाचे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांनी या परिसरात तब्बल तीन तास शोध मोहीम राबवली.

येथील सर्पमित्र संदीप वाघ यांना गुरुकुल शाळेजवळील एकनाथ रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये बिबट्याची पिल्ले असल्याची माहिती मिळाली होती.अपार्टमेंटच्या नागरिकांनी तत्काळ येथे येऊन या पिल्लांना सुरक्षित अधिवासात सोडण्यासंदर्भात तयारी सुरू केली. वाघ यांनी सातारा वनविभागाचे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांच्याशी संपर्क केला. जोपळे यांच्यासह आणि वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या टेरेसवरून थर्मल ड्रोन उडवला .

या ड्रोनच्या माध्यमातून सुमारे अडीच तास बिबट्या मादीचा शोध घेण्यात आला .थर्मल ड्रोन च्या माध्यमातून बिबट्याच्या पावलाचे ठसे किंवा त्याच्या भ्रमण मार्गाचे धागेदोरे मिळतात का याची पाहणी करण्यात आली. मात्र या शोध मोहिमेला यश आले नाही. बुधवारी सुद्धा दिवसभर ड्रोनच्या माध्यमातून बिबट्या मादीचा शोध घेतला जात होता. या प्रकरणाची दखल उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी घेत वनविभागाच्या कर्मचारी पथकाला तात्काळ सूचना दिल्या. मादी बिबट्या व पिल्ले यांची पुन्हा भेट घडविण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत.मानव बिबट्या संघर्षाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बिबट्याचा भ्रमण मार्ग बाधित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे .


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मिशन वासल्य योजना मिशन मोडवर राबविणार - जिल्हाधिकारी संतोष पाटील; महिन्याभरात सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना
पुढील बातमी
लक्ष्मीटेकडी सदरबझार येथील वस्ताद मैदानाजवळ मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या