कराड : कराड पालिकेच्या माजी नगरसेवकांनी मंगळवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र ऊर्फ अप्पा माने, माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर व यशवंत विकास आघाडीच्या नेत्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती स्मिता हुलवान या तिघांनी आज कमळ हातात घेतले. कराड पालिकेच्या राजकारणात आता घडामोडींनी वेग घेतला असून हे पक्षप्रवेश महत्वपूर्ण मानले जात आहेत.
मुंबई येथील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी हे पक्षप्रवेश पार पडले. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र माने, माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रजीत गुजर, माजी विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, संजय कांबळे यांचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी भाजपमध्ये स्वागत केले. हा पक्षप्रवेश भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वात पार पडला. यावेळी यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
गत आठवड्यात कराड पालिकेच्या नगराध्यक्ष आरक्षण सोडतीसह प्रभाग आरक्षण निश्चित झाले आहे. त्यामध्ये यंदा 25 वर्षानंतर प्रथमच पालिकेच्या नगराध्यक्षपदी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी मिळाल्याने राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. आपापल्या प्रभागामध्ये ‘मी’ नाही तर ‘सौ’ अशी इच्छूकांनी तयारीही सुरू केली आहे. या पार्श्वभुमीवर राजकीय खेळींना सुरूवात झाली असून त्याचा प्रत्यय आजच्या पक्षप्रवेशापासून सुरू झाला आहे. आगामी काळात अशा घडामोडी जोर धरणार असून कोण कोणाच्या गळाला लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.