सातारा : साताऱ्याचे पहिले आयर्नमॅन डॉ. सुधीर पवार यांनी आजपर्यंत अनेक हाफ, फुल तसेच अनेक अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. सरावाचा एक भाग म्हणून त्यांनी बारा तास धावण्याचे नियोजन केले. त्यानुसार त्यांनी नुकतेच सातारा- मेढा- सातारा हे १०१ किलोमीटर अंतर १२ तास २५ मिनिटे सलग धावून पूर्ण केले.
डॉ. सुधीर पवार यांनी सातारा- मेढा सातारा अंतर दोन वेळा धावून पूर्ण केले. यामध्ये सुरुवातीला प्रचंड पाऊस पडला. त्यानंतर रात्रभर पावसाची रिमझिम सुरुच होती. अशा अवस्थेत न डगमगता त्यांनी धावणे सुरुच ठेवले. रात्री १० नंतर खूप झोप येत होती. अशा अवस्थेत कधी डोक्यावर पाणी ओतून घेणे, कधी बर्फ लावणे, असे करत त्यांनी धावणे सुरु ठेवले. धावताना डॉ. पवार यांनी पाणी, ओआरएस, खजूर, सॉल्ट कॅप्सुल्स, एनर्जी जेल, प्रोटीन बार्स, कोक यांचा उपयोग केला. 'सातारा हिल रनर्स वर्कआउट ग्रुप' मधील काही रनर्सनी त्यांच्या पाठिंब्यासाठी हजेरी लावली होती.
डॉ. सुधीर पवार यांच्या पत्नी डॉ. नीलिमा पवार, ओम श्रीराम, वडील पी. बी. पवार यांनी धावून डॉ. सुधीर पवार यांना प्रोत्साहन दिले. यामध्ये सलग १२ तास २५ मिनिटे किशोर गुजर यांनी साथ दिली. संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेमध्ये सुनीत शहा, राहुल दहिधुले, विष्णु शिंदे, केदार डोंबे यांनी साथ दिली. रात्री ९ ते पहाटे १ या वेळेमध्ये संदेश कुडचीकर, सुनील लोंढे यांनी साथ दिली. पहाटे 1 ते 5.25 या वेळेमध्ये सागर चतुर व शिवाजी गुजर, राजेंद्र रासकर, विजय भिलारे, संतोष जगदाळे त्यांच्याबरोबर होते.
सुरुवातीला कण्हेर धरणापासून २५ किलोमीटर अक्षय विष्णू शिंदे यांनी डॉक्टरांबरोबर धावत त्यांना साथ दिली. नंतर परतीच्या प्रवासात कोंडवे गावातून सागर निंबाळकर, निलेश चोरगे, अरबाज खान, सुदर्शन जगताप यांनी काही अंतर त्यांच्याबरोबर धाव घेतली. पहाटे राहुल जाधव यांनी त्यांच्याबरोबर 10 किलोमीटर धाव घेतली. या सरावादरम्यान, डॉ. सुधीर पवार सायंकाळी जेवढे उत्साही होते तेवढेच पहाटे सराव संपल्यानंतरही उत्साही होते. अतिशय सहजरित्या १०१ किलोमीटरचा सराव डॉ. पवार यांनी पूर्ण केला. डॉ. सुधीर पवार यांचे स्नेही, सातारा डॉक्टर कम्युनिटी, सातारा हिल रनर्स, रनिंग कम्युनिटी, स्विमिंग ग्रुप यांनी डॉ. सुधीर पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.