'अजिंक्यतारा'कडून सभासद- शेतकऱ्यांची दिवाळी गोड; प्रति टन १०० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

by Team Satara Today | published on : 07 October 2025


सातारा  : सहकार क्षेत्रातील अग्रणी साखर कारखाना अशी ओळख असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने गाळप झालेल्या उसाला दिवाळीपूर्वीच प्रति टन १०० रुपये हप्ता संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून ऊस पुरवठादार सभासद- शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. 

शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने २०२४- २५ च्या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाची प्रति टन ३२०० रुपये याप्रमाणे संपूर्ण रक्कम संबंधित शेतकऱ्यांना अदा केली होती. दरम्यान, कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संचालक मंडळाने दिवाळीसाठी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना आणखी १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला. याबाबत ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी कारखान्याच्या वार्षिक सभेत आणि बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात प्रति टन १०० रुपये हप्ता देणार असल्याचे जाहीर केले होते. 

त्यानुसार २०२४- २५ या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाचा प्रति टन १०० रुपये दुसरा हप्ता नुकताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आला असून प्रति टन १०० रुपये याप्रमाणे होणारी एकूण रक्कम ५ कोटी ७४ लाख रुपये बँक खाती जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांनी दिली असून संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच प्रति टन १०० रुपयांचा दुसरा हप्ता मिळाल्याने संबंधित शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांची फी माफ करा; विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मनसेची मागणी
पुढील बातमी
सदोष वैद्यकीय सेवा पुरवल्‍याबद्दल १२ लाख रुपये दंडाची डॉ. स्‍मिता कासार यांना शिक्षा

संबंधित बातम्या